औरंगाबाद -5 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्या दिवशी न्याय मिळाला नाही, तर 6 फेब्रुवारीपासून मराठा समाज तीव्र आंदोलनाला सुरुवात करेल, असा इशारा मराठा क्रांतीमोर्चाच्या वतीने देण्यात आला. आरक्षण आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदेत समन्वयक संजय सावंत यांनी ही माहिती दिली.
माहिती देताना मराठा क्रांतीमोर्चाचे समन्वयक संजय सावंत हेही वाचा -भरधाव ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू
1 फेब्रुवारीला निघणार मशाल मोर्चा...
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी वेगवेगळ्या स्वरुपाच्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याची सुरुवात 20 जानेवारी रोजी जालना येथील साष्टपिंपळगाव, कोल्हापूर आणि आझाद मैदान या ठिकाणी करण्यात आली. याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून साष्टपिंपळगाव येथून मशाल रॅलीला सुरुवात करून औरंगाबाद येथे रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. समारोपाच्या वेळी क्रांतीचौक भागात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती संजय सावंत यांनी दिली.
विजय वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा...
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ ओबीसीबाबत आक्रमक भूमिका मांडत आहेत. राज्याचे मंत्री म्हणून काम करत असताना अशा पद्धतीने जातीवाचक विधान करणे त्यांनी टाळले पाहिजे होते. मात्र, जातीवाचक विधान करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज्यातील हे दोन मंत्री करत आहेत. त्यामुळेच, विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करून समाजाचे काम करण्यासाठी त्यांना मुक्त करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
नोकर भरती रद्द करावी...
मराठा आरक्षणासाठी 42 बांधवांनी आपले बलिदान दिले. अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. 13 हजार 726 तरुणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले. तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. सारथीला न्याय मिळाला नाही. तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अद्यापही न्याय मिळाला नसताना आरक्षणामधून नियुक्त झालेल्या एमपीएससी व इतर विभागाच्या तरुणांना नोकऱ्यांमध्ये समावून घेतले नाही. या सर्व मागण्या करण्यासाठी जुनी नोकर भरती रद्द करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली.
पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय सावंत, सचिन मिसाळ, गणेश उगले, अमोल साळुंखे, प्रदीप नवले, मनीषा मराठे, सतीश जगताप, सुभाष सूर्यवंशी, राहुल भोसले, सुनील बोडके आदी समन्वयक उपस्थित होते.
हेही वाचा -प्रजासत्ताक दिन विशेष: हैदराबाद संस्थानात होता राजाला वाटेल तोच कायदा