औरंगाबाद -मराठा क्रांतीमोर्चाने तीन वर्षांपासून आंदोलन करून आपल्या मागण्या सरकारपुढे मांडल्या. मात्र, अनेक मागण्या सरकार अद्याप मान्य कारायला तयार नाही. त्यामुळे मागण्या मान्य करा अन्यथा परिणामाला सामोरे जा, असा इशारा औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सरकारला दिला आहे. यशवंत कला महाविद्यालयात मराठा क्रांतीमोर्चाची पुढील दिशा ठरवण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
'मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा, अन्यथा परिणाम भोगा' - maratha protest
यशवंत कला महाविद्यालयात मराठा क्रांतीमोर्चाची पुढील दिशा ठरवण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सरकारला हा इशारा देण्यात आला.
येणाऱ्या पंधरा दिवसात मराठा समाजाच्या 60 विविध संघटनांची महत्वाची बैठक राज्यात पार पडणार असून या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. सरकारने मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्या नाही, तर निवडणुकीत मराठा समाज सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला.
या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार उदासीन असल्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेत सरकार विरोधात एल्गार पुकारणार असल्याचा निर्धार करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने अनेक आंदोलन मागील तीन वर्षात केली. आपल्या मागण्या मान्य होतील, असा आश्वासन सरकारने वेळोवेळी दिला. मात्र, सरकार अश्वासनाशिवाय दुसरे काही देत नसल्याने मराठा संघटना एकत्र येऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले.
पुढील 15 दिवसात मराठा समाजाच्या 60 संघटना एकत्र येऊन पुढील दिशा ठरवतील. तसेच सरकारने न्याय दिला नाही तर निवडणुकीत धडा शिकवू, असा इशारा यावेळी देण्यात आला.