गंगापूर (औरंगाबाद) - खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी शनिवारी कायगाव येथील काकासाहेब शिंदे स्मृतीस्थळास अभिवादन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, १६ जूनपासून मूक आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी ५८ मोर्चे काढत आपली ताकद दाखवली आहे. राज्य सरकारकडे पाच मागण्या केले आहेत. त्यावर राज्य सरकारने विचार करावा. तर पुढील आंदोलनाचा प्रश्नच येणार नाही. आम्ही इथून पुढे ५ जिल्हात मूक आंदोलन करणार आहोत. मी मराठा समाजाची दिशाभूल होऊ देणार नाही. आम्हाला कोणत्याही पक्षाशी देणे-घेणे नाही, गरीब समाजाला न्याय द्यावा, हीच आमची मागणी असल्याचेही यावेळी संभाजीराजे म्हणाले आहेत.
पुणे ते मुंबई लाॅगमार्च काढणार -
'मराठा आरक्षणप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट' करत संभाजीराजे (१६ जून) पासून आंदोलनाची घोषणा केली आहे. या मूक आंदोलनाची सुरुवात कोल्हापूर येथील राजर्षी शाहु महाराज यांच्या समाधीस्थळापासून होणार आहे. तसेच, पुणे ते मुंबई लाॅगमार्च काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून खासदार संभाजीराजे भोसले यांनी शनिवारी गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे काकासाहेब शिंदे स्मृतिस्थळास अभिवादन केले. यावेळी त्यांनी काकासाहेब शिंदे यांच्या बंधूंचीही भेट घेतली. मराठा समाजासाठी ज्या बांधवांनी बलिदान दिले आहे. त्याच्या घरातील व्यक्तीस सरकारने नोकरीस रूजू करावे, अशी सरकारला विनंती केली आहे. यावेळी औरंगाबाद नगर महामार्गावर सकाळपासून कायगाव पुलावर मोठा पोलीस बंदोबस्त होता.