मनोज जरांगे पाटील आरक्षणा संदर्भात सरकारला इशारा देताना गंगापूर (छत्रपती संभाजी नगर)Manoj Jarange Patil On Maratha Reservation :सरकारला आरक्षण देण्यासाठी ४० दिवसांचा वेळ दिला असून सर्वसामान्य आता आरक्षणसाठी पेटून उठला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ते आम्ही मिळवणारच आहे. त्यासाठी मराठा समाजाने एकजूट कायम ठेवावी शांततेत आंदोलन करावं. उद्रेक होणारे आंदोलन करू नये. आरक्षणा करता कोणीच आत्महत्या करू नये असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. तसंच 14 ऑक्टोबरला अंतरवाली येथे होणाऱ्या सभेसाठी गंगापूर तालुक्यातील जास्तीत जास्त मराठा बांधवांनी उपस्थित राहावे ही शेवटची संधी आहे, असं आवाहन त्यांनी केलं.
हुतात्मा काकासाहेब शिंदे स्मृतीस्थळास अभिवादन :मराठा आरक्षणासाठी कायगाव येथील गोदावरी नदीत जलसमाधी घेणारे हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीस्थळास मनोज जरांगे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसंच मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. आरक्षण देण्यासाठी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला आहे. आरक्षण भेटल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
आरक्षण देईपर्यंत लढा सुरूच राहणार :मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंदी आहेत. मराठा कुणबी ओबीसीचे ५००० पुरावे आहेत. सरकारला आणखीन किती पुरावे लागणार? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. सरकारने वेळकाढूपणा करू नये. आता आरक्षणाचा लढा सामान्य मराठा बांधवाकडे आहे. त्यामुळे आरक्षण सरसकट द्यावे लागेल. तोपर्यंत हा लढा चालूच राहणार. शासनाने माझ्या विरोधात खूपच अडचणी आणल्या. उपोषण उठवण्यासाठी खूप प्रयत्न केले; पण मी लाठ्या-काठ्या खाऊनसुद्धा माघार घेतली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षण समिती कामाला लागली :मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत चाचपणी करण्यासाठी सरकारने मराठा आरक्षण समितीला मराठवाड्याच्या दौऱ्यावर पाठवले आहे. ही समिती ११ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आली. पहिले ही समिती कामच करत नव्हती. नुसती हैदराबादला जायची तेथून मुंबईला यायची. मुंबईहून परत संभाजीनगरला यायची आणि परत हैदराबादला जायची. समितीला एकही पुरावा सापडला नाही; कारण समितीत अभ्यासक नव्हते. त्यानंतर अभ्यास केल्यानंतर चार दिवसात बातमी आली ती, ५००० पुरावे सापडल्याची. कायदा पारित करायला पुरावे लागतात. आता पाच हजार पुरावे सापडल्याने कायदा पारित करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. कार्यक्रम स्थळी मुस्लिम समाज, आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय संघटना, धनगर समाज, जैन समाज, बहुजन समाजातील विविध संघटनेचे नेते येत आहेत. सभास्थळी मोठ्या संख्येने मराठा बांधव, भगिनी, तरुणांची उपस्थिती होती.
हेही वाचा:
- Congress On Lalit Patil Escape Case: 'या' प्रकरणी मंत्री दादा भुसे, तानाजी सावंत यांचा त्वरित राजीनामा घ्या; कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पनवेल दौऱ्यावेळी शेकाप, महाविकास आघडीचं आंदोलन...खड्ड्यांना घातले फुलांचे हार
- Navratri Festival And Chaat Puja : नवरात्रोत्सव आणि छटपूजेसाठी मुंबई महानगरपालिकाच व्यवस्था करणार - अॅड आशिष शेलार