प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर Maratha Reservationl : २४ डिसेंबरनंतर आरक्षणाचा लढा सुरू ठेवण्याबाबत भूमिका ठरवण्यासाठी १७ डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याची माहिती, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली. सरकारनं अनेकवेळा विश्वासघात केला आहे, त्यामुळं आता नियोजन करणार आहोत. तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे त्यांच्यावर असलेले आरोप धुण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नादी लागू नये, असंही जरांगे पाटील म्हणाले.
17 डिसेंबरला ठरणार भूमिका : 24 तारखेपर्यंत जर सरकारनं आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला नाही तर, नेमकी भूमिका काय असावी, याकरिता 17 डिसेंबर रोजी बैठक बोलवण्यात आली आहे. अंतरवाली येथे ही बैठक होणार आहे. सकाळी नऊ ते बारा प्राथमिक चर्चा आणि त्यानंतर मुख्य चर्चाला प्रारंभ होणार आहे. यामध्ये राज्यातील आरक्षणाच्या लढ्यातील आयोजक, साखळी उपोषण करणारे आंदोलक यांची उपस्थिती राहणार आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पुढील दिशा यात ठरवली जाणार आहे. आरक्षण मिळालं नाही तर शांततेत आंदोलन आम्ही करू. आंदोलनाचे अद्याप नियोजन ठरलेलं नाही, जशी दिशा ठरेल ती अंमलात आणू, समाजाला विचारल्याशिवाय आम्ही एकट्याच्या विचाराने पुढे जाणार नाही. त्यामुळं नियोजन ठरल्यावर पुढे माहिती देऊ, समाज जे म्हणेल तो निर्णय आम्ही घेऊ, असं आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
मुंबईत जाणार मोर्चा? :आरक्षण मिळालं नाही तर ट्रॉलीसह ट्रॅक्टर घेऊन मुंबई गाठू अशी चर्चा समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहे. मात्र असा कुठलीच निर्णय अद्याप झालेले नाही. मुदत झाल्यावर बैठक घेणार होतो. मात्र विश्वास उडवणाऱ्या काही घटना घडल्या असल्याने, आता 17 डिसेंबर रोजी बैठक घेऊन भूमिका जाहीर करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. आंदोलन मागे घेत असताना काही आश्वासन आम्हाला देण्यात आली होती. त्यात, आंदोलकांवर गुन्हे दाखल करणार नाही असं सांगितलं होतं. मात्र मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्याचबरोबर अंतरवाली येथे आंदोलकांना अटक करणार नाही असं देखील सांगितलं होतं, मात्र काही मुलांना ताब्यात घेतलं आहे. आरक्षणाबाबत लेखी आश्वासन देऊ असं म्हणले होते, मात्र तेही अद्याप मिळालेलं नाही. विनाकारण त्रास दिला जातोय, मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मुद्दाम काही लोकांना अडकण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळंच 17 तारखेला ही बैठक घेत असल्याचा जरांगे पाटील यांनी सांगितलंय.
मागे घेण्यासाठी भुजबळ यांचा दबाव : गोळी घालून मला ठार मारण्याचा कट केला जातोय, असा आरोप ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. यांना गोळी घालून हात खराब आम्ही करणार नाही, ते मुद्दाम चित्र रंगवत आहेत. समानता असण्याची भाषा ते करतात, मात्र, धनगर आरक्षणाबाबत त्यांनी भूमिका जाहीर केली नाही, हातपाय तोडण्याची भाषा हेच करतात, आंदोलन उभी करून समाजात विष घालवण्याचं काम भुजबळ स्वतः करत आहेत. मात्र आम्ही यांच्यासारखे नाहीत, नाशिकमध्ये असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या, मात्र आम्ही त्या हाताळल्या. आमच्या जीवाला देखील धोका आहे, मात्र पोलिसांनी त्याबाबत आम्हाला रिपोर्ट का दिला नाही? मात्र त्यांना आम्ही नक्कीच उत्तर देऊ, आम्ही भिणारे नाही, यांना कोणी रिपोर्ट दिला ते सांगा. आम्ही यांच्यासारखे रडून खोटं बोलून पोलीस सोबत ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. आमची सुरक्षा देखील यांना देऊन टाका. यांच्यावरील असलेले आरोप यांना मागे घ्यायचं असल्यानं हे दबाव तंत्राचा वापर करत आहे. यांना पुन्हा जेलमध्ये जाण्याची इच्छा नसल्यानं ते असं करत आहे, यांना आरक्षणात समानता का नको? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना विचारला आहे.
हेही वाचा -
- मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सभा संपल्यानंतर केलं रुग्णालयात दाखल
- कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी मराठवाड्यात कमी, अधिकाऱ्यांचा हलगर्जी केल्याचा जरांगे पाटील यांचा आरोप
- शिंदे समिती राज्य सरकारला दोन दिवसांत करणार अहवाल सादर