छत्रपती संभाजीनगरMangesh Sable On Gunaratna Sadavarte :ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यास, त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा मराठा आंदोलक मंगेश साबळे यांनी दिला. मराठा तरुण आत्महत्या करत आहेत, तर ॲड. सदावर्ते मराठा समाजाच्या भावना दुखावत आहेत, मराठा समाजाला माजोरडे म्हणत आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळून देणार नाही, असं म्हणत आहेत. आज आमच्या समाजाचे मुडदे पडत आहेत. त्यामुळं त्याची गाडी फोडली. त्यांनी मराठा समाजाबद्दल अशी वक्तव्यं न थांबवल्यास वाईट परिणाम सदावर्तेंना भोगावे लागतील, असा इशारा मंगेश साबळे यांनी दिला आहे.
...म्हणून आमचा रोष :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलंय. त्यांनी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र, तो वेळ संपला असून शासनावर आम्हाला भरोसा राहिलेला नाहीये. शांततेत आंदोलन सुरू असताना सदावर्ते समाजाला मुद्दाम राग आणण्याचं काम करत आहेत. शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, म्हणून आमचा रोष व्यक्त केला. जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे, ते सुरूच राहील. जरांगे पाटील यांच्या जिवाला काही होऊ नये, असं वाटतं. मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मंगेश साबळे यांनी दिला.
स्वतःची गाडी जाळली म्हणून त्यांची फोडली :मराठा समाजावर झालेल्या लाठीमारनंतर आमच्या आई बहिणींचं रक्त सांडलं. आमच्या समाजाच्या नेत्यांकडं महागड्या गाड्या आहेत. त्यांनी कुठलीच भूमिका घेतली नाही. जे लोकप्रतिनिधी निवडून दिले, ते नेते पैसे कमावून बसले आहेत. त्यांच्याकडे पाच-दहा गाड्या आहेत. त्यातली त्यांनी एखादी गाडी जाळून दाखवली नाही. त्यामुळं माझ्यासारख्या सरपंचाला एक गाडी जाळावी लागली. आंतरवाली सराटीमध्ये रक्तपातची घटना घडली, त्याचा निषेध म्हणून मी गाडी जाळली. समाजाबद्दल अपशब्द वापरला म्हणून, सदावर्तेंची गाडी फोडली असं मत मंगेश साबळे यांनी व्यक्त केलं.