औरंगाबाद- दुचाकी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला सातारा पोलिसांनी अटक केली. दोन महिन्यापूर्वी सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महागडी बुलेट चोरीला गेली होती. पोलिसांकडून याप्रकरणी तपास घेण्यात आला. तपासा आधारे पोलिसांनी नेवासा येथून एका चोरट्यास अटक केली आहे. जॅकी उर्फ संदिप रमेश चांदणे (वय २४, रा. नेवासा खुर्द) असे आरोपीचे नाव आहे.
सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वळदगाव परिसरातील योगेश भास्कर शिंदे यांनी आपली दुचाकी क्र. (एम.एच. २० ई.एम. १३४८) दुचाकी घरासमोर उभी ठेवली होती. मात्र, ३० सप्टेंबर रोजी सकाळी ती ठेवलेल्या जागी आढळली नाही. त्यानंतर सातारा पोलीसांकडून याप्रकरणी तपास करण्यात आला. तपासादरम्यान हवालदार विलास वैष्णव यांना हा प्रकार नेवासा फाटा येथील चोराने केल्याची माहिती मिळाली होती. याबाबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये ते सिद्ध होताच पोलिसांनी सापळा रचला व चोरट्याला नेवासा परिसरातून अटक केली.