औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसऱ्या विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढले, असे मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केले.
पहिल्या फेरीपासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. सतीश चव्हाण यांना एकूण १,१६,६३८ मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना ५८,७४३ मते मिळाली. पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण यांना ५७,८९५ मते विजयी घोषित करण्यात आले. बारा वर्षात केलेल्या कामामुळे विजय मिळाल्याचे सतीश चव्हाण यांनी सांगितले. महाविकास आघाडीमुळे मताधिक्य वाढले असून आघाडीच्या अजेंड्यानुसार पुढील काम केले जाईल, असा विश्वास सतीश चव्हाण यांनी व्यक्त केला.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीचा निकाल जाहीर.. पदवीधरांची २३ हजार मतं बाद - पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदार जनजागृती अभियान राबवूनही २०१४ च्या निवडणुकीच्या मानाने दुप्पट मतं बाद झाली. यावेळी तब्बल २३,०९२ मतं बाद झाली. चुकीच्या पद्धतीने मत नोंदवणे, खाडाखोड करणे याच बरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करणे, असे प्रकार मोठ्या प्रमाणात झाल्याने २३,०९२ मतं बाद झाली. त्यामुळे पुढच्या वेळी मतदार नोंदणी सोबत जनजागृतीसाठी विशेष अभियान राबवावे लागणार आहे.
आघाडीच्या सर्व घटकांनी काम केल्याने विजय मिळाला -
महाविकास आघाडीच सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षातील सर्व घटकांनी काम केल्याने विजय मिळाला, असे मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत भाजप नेत्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यांमुळे शिवसैनिक चिडले होते. त्यामुळे पूर्ण ताकतीने शिवसैनिकांनी पेटून उठून काम केले आणि मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. आता मराठवाडा फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचा आहे इतर कोणाचा नाही, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला.
जनतेच्या मनातील खदखद बाहेर पडली -
राज्यात महाविकास आघाडीला मिळालेला विजय म्हणजे जनतेच्या मनात भाजप विषयी असलेली खदखद बाहेर पडली, असा टोला माजी आमदार आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी लगावला. जनतेने कौल दिल्याने महाविकास आघाडी भक्कम झाली आहे. जनतेला महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही, त्यामुळे सतीश चव्हाण यांचा विजय निश्चित झाला. महाविकास आघाडीमुळे चांगले मताधिक्य मिळाले. ही आघाडी भविष्यात कायम राहील. अस मत डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केला.
भाजपा म्हणजे फेसबुक पार्टी -
भाजपाचा पराभव पूर्वीच निश्चित होता. भाजप म्हणजे फेसबुक पार्टी झाली आहे. काम काही नाही मात्र हवा जास्त असे पक्षाचे काम आहे. असा आरोप जयसिंगराव गायकवाड यांनी केला. आज काल आलेले आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये, बाजार बसवीने दुसऱ्याच्या कुंकवाची चर्चा करू नये. असा टोला गायकवाड यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावत भाजपवर निशाणा साधला.
हेही वाचा -'आमच्याकडे चौथे चाक हे जनतेचे, आम्ही हा रथ पुढे नेत आहोत'
हेही वाचा -'पुढील पंचवीस वर्षे महाराष्ट्राचा गाडा पुढे न्यायचा आहे'