औरंगाबाद - औरंगाबाद मतदारसंघात एक खासदार विरुद्ध ३ आमदार, अशी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे गेल्या २० वर्षांपासून औरंगाबादमधून निर्विवाद निवडणूक जिंकत आले आहेत. मात्र, यावेळची निवडणूक त्यांच्यासाठी निश्चितच परीक्षा घेणारी आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात सेना आमदार हर्षवर्धन जाधव, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि काँग्रेस आमदार सुभाष झांबड हे ३ आमदार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
मतदारसंघाची पार्श्वभूमी
औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात गेल्या ३० वर्षापासून महानगरपालिकेवर शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे. इतकंच नाही तर गेल्या २० वर्षांपासून औरंगाबादचा खासदार हा शिवसेनेचाच राहिला आहे. मात्र, या बालेकिल्ल्यात आता शिवसेनाच अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. गेल्या २० वर्षांत औरंगाबादचा मंदगतीने होणारा विकास ही सर्वात मोठी डोकेदुखी शिवसेनेसमोर असणार आहे. गेल्या २० वर्षांत खासदार चंद्रकांत खैरे लोकप्रतिनिधी म्हणून प्रभावी ठरू शकले नाहीत. शहराची समांतर जलवाहिनी असो, की भूमिगत गटार योजना, या योजना अजुनही सुरू झालेल्या नाहीत. त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतोय. या शिवाय शहरात ज्या पद्धतीने विकास होणे अपेक्षित होते, तो विकासही झालेला नाही.
शहरांमध्ये एकही नवीन प्रकल्प आलेला नाही. औद्योगिक वसाहतीत अनेक कारखानदार आपला उद्योग दुसऱ्या राज्यात हलवण्याच्या मनस्थितीत आहेत. सोयी-सुविधांचा अभाव, हा या शहराच्या विकासाला मारक राहिला आहे. त्यामुळेच या वेळी खासदार चंद्रकांत खैरे हे निश्चित अडचणीत सापडले आहेत. औरंगाबाद शहर हे जाताय समीकरणापलीकडे कधी जाऊ शकलेले नाही. हिंदू विरुद्ध मुस्लीम, अशीच लढत गेल्या २० वर्षात औरंगाबादेत पाहायला मिळाली आणि याचाच फायदा शिवसेनेला नेहमी होत राहिला. यंदा खासदार खैरे यांचा पराभव करण्यासाठी जिल्ह्यातील तीन आमदार निवडणूक लढवत आहेत.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ९ पैकी ६ विधानसभा येतात. त्यात
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे (भाजप)
औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाट (शिवसेना)
औरंगाबाद मध्य - इम्तियाज जलील (एआयएमआयएम)
गंगापूर - प्रशांत बंग (भाजप)
वैजापूर - भाऊसाहेब चिकटगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
कन्नड - हर्षवर्धन जाधव (शिवसेना)
फुलंब्री, सिल्लोड, पैठण हे मतदार संघ जालना लोकसभा मतदार संघात येतात.
शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव (अपक्ष)मैदानात
कन्नड विधानसभेचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव लोकसभेच्या निवडणुकीत नशीब आजमवणार आहेत. हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव यांची पुण्याई हर्षवर्धन यांच्या कामी येते. काँग्रेससोबत मतभेद झाल्यावर हर्षवर्धन जाधव यांनी २००९ मध्ये मनसेतर्फे निवडणूक लढवत आमदारकी मिळवली. ५ वर्षांच्या कार्यकाळात हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरे यांच्यात बिनसल्याने हर्षवर्धन जाधव यांनी २०१४ मध्ये शिवसेनेतर्फे विधानसभा लढवत विजय मिळवला. मात्र, खासदार खैरे यांच्याशी सतत वाढत चाललेल्या वादानंतर हर्षवर्धन यांनी शिवसेनेला रामराम ठोकत शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना करत लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. हर्षवर्धन जाधव कन्नड आणि वैजापूर तालुक्यात आपली ताकद आणि मराठा क्रांती मोर्चात असलेला सक्रिय सहभाग यामुळे आपला विजय होऊ शकतो. याच आशेवर हर्षवर्धन यांनी लोकसभेच्या रिंगणार उडी घेतली आहे.
काँग्रेस उमेदवार - सुभाष झांबड
खैरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याने आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार आमदार सुभाष झांबड यांना आहे. गेल्या ६ वर्षापासून सुभाष झांबड हे काँग्रेसचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आहेत. गेल्या ६ वर्षात खासदारकी लढवण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात आपला जनसंपर्क चांगलाच वाढवला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबत झालेल्या वादानंतर आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेचे तिकीट मिळणार नाही, अशी शक्यता होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी आमदार सुभाष झांबड यांच्या गळ्यात माळ टाकली. त्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. अब्दुल सत्तार यांचे बंड थंड जरी झाले असले तरी आता काँग्रेसच्या हातात हात घालणार नाही, अशी घोषणा अब्दुल सत्तार यांनी केली. मात्र, खासदार खैरे यांच्या विरोधात असलेली लाट आणि काँग्रेसची वाढलेली ताकद यामुळे आपला विजय होईल, असा विश्वास सुभाष झांबड यांनी व्यक्त केला आहे.
दलित आणि मुस्लीम मतावर आमदार इम्तियाज जलील यांची मदार
२०१९ ची लोकसभेच्या निवडणुकीत दलित आणि मुस्लीम मते निर्णायक ठरणार आहेत. २ ऑक्टोबर 2018 रोजी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीची घोषणा केली या सभेला प्रतिसाद चांगला मिळाला. त्यानंतर एमआयएम पक्षाने औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व या २ मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याने या मतदारसंघात एमआयएमची ताकद मोठी आहे. महानगरपालिकेत एमआयएमचे २५ नगरसेवक आहेत. त्यामुळे एमआयएमची ताकद ही खूप मोठी मानली जाते. त्याचबरोबर मुस्लीम समाजासोबत दलित आणि बहुजन समाज हा बहुजन वंचित आघाडीच्या मागे उभा असल्याने मोठी ताकत निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी एमआयएम पक्षाने औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार इम्तियाज जलील हे बहुजन वंचित आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दलित आणि मुस्लीम मतदार लोकसभा निवडणुकीचे निर्णायक मतदार, असतील यात शंका नाही.