औरंगाबाद - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद शहरामध्ये १८ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र रुग्णांची सतत वाढणारी संख्या पाहता हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या ९०१वर पोहोचली आहे. ही संख्या आणखी वाढू नये, यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. पोलीस प्रशासनाकडून शहरातील कन्टेनमेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यासोबतच, कन्टेनमेंट झोनमधून बाहेरील भागात, तसेच बाहेरील भागातील नागरिकांचे कन्टेनमेंट झोनमध्ये होणारे आवागमन बुधवारपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले गेले आहेत.