औरंगाबाद - जागतिक टपाल दिनानिमित्त औरंगाबादेत अनोखा उपक्रम राबविण्यात आला. ऑनलाइनच्या काळात सर्वांशी संवाद साधण्यासाठी मोबाईल इंटरनेटचा वापर केला जात आहे. या संवादात मात्र पत्र लिहिण्याची सवय कोणालाही राहिलेली नाही. आजच्या लहान मुलांना तर पत्र काय आहे हे देखील माहित होत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये पत्र लिहिण्याची सवय असावी यासाठी औरंगाबादेत पत्रलेखनाचा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.
सिडको टपाल कार्यालयात हा उपक्रम राबवण्यात आला. दोन दिवसांपूर्वी लहान मुलांना पत्र लिहिण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास दोनशेहून अधिक पत्र लिहून पाठवण्यात आले. त्यानुसार वर्षभरात एक हजार पत्र मुलं लिहितील अशा पद्धतीचे नियोजन केले जाणार आहे. पत्र लिहिण्याची पद्धत मुलांना माहित व्हावी, तशी सवय मुलांमध्ये रुजवून त्यांना लिहीतं करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेल्याची माहिती पत्रलेखन उपक्रमाचे अध्यक्ष अभिजीत हिरप यांनी दिली.
औरंगाबादेत लहान मुलांसाठी पत्रलेखनाचा उपक्रम आज इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आपल्या लोकांशी संवाद साधणे सोपे झाले आहे. त्यात काळाच्या ओघात पत्र लिहिण्याची सवय जवळपास मोडली आहे. त्यात लहान मुलांना तर पत्र कसे लिहितात हे फक्त शालेय पुस्तकातच वाचायला मिळते. त्यामुळे पत्र कस लिहावे, लिहिलेले पत्र आपण दिलेल्या पत्त्यावर कसे पोहचते याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचा उद्देश्य ठेवत जगातील टपाल दिनानिमित्त पत्र लिहिण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पहिल्या टप्प्यात शहरातील विविध भागांमधून काही मुलांनी तसेच पत्र लेखन उपक्रमातील सदस्यांच्या मुलांनी यात सहभाग नोंदवला. आज जवळपास दोनशे पत्र लिहिण्यात आले. मुलांनी आपल्या आजी- आजोबा, काका-काकू, मावशी, मित्र त्याच बरोबर शासकीय अधिकाऱ्यांना पत्रं लिहिली. अभिषा नावाच्या लहान मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांची विचारपूस केली आहे. मुलांनी पत्रामध्ये कोरोनाबाबत कशी काळजी घेत आहात, कशी काळजी घ्यायला हवी याबाबत विचारणा केली आहे. पत्र लिहिताना मोठी उत्सुकता लागली होती. पत्र लिहिताना होणाऱ्या चुकादेखील कळल्या. आता हे पत्र मिळाल्यावर त्याचे उत्तर कसे येईल याबाबत अधिक उत्सुकता असल्याची प्रतिक्रिया पत्र लिहिणाऱ्या मुलांनी दिली.
हेही वाचा -वंचित बहुजन आघाडीने उत्तर प्रदेश सरकारला पाठविले काळ्या चपलांच्या हाराचे पार्सल