पैठण (औरंगाबाद)- पैठण तालुक्यातील थेरगाव येथे सकाळी 8 च्या सुमारास एका शेतकऱ्यास बिबट्या दिसला. ही माहिती पंचक्रोशीतील नागरिक व शेतकऱ्यांना कळताच त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, औरंगाबाद वन खात्याला बिबट्याला पकडण्यात यश आल्यानंतर सर्वांची भीती दूर झाली.
थेरगावमध्ये शेतकऱ्यास बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच औरंगाबादहून वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी तांबे त्यांच्या टीम सोबत घटनास्थळी त्वरित दाखल झाले. त्यांच्यासोबत पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक येरमे देखील पोलीस कर्मचाऱ्यांसह आले होते. बिबट्याचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला.