छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मध्ये आज अवयव दान जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वच पक्षातील नेते खेळीमेळीच्या मूडमध्ये दिसले. नुकतेच रामनवमीच्या दिवशी शहरात दंगल उफाळून आली होती. यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले होते. या कार्यक्रमादरम्यान मात्र आता हेच नेते एकमेकांशी हसत गप्पा मारताना दिसून आले. शहरात झालेल्या दंगलीच्या वातावरणात काही दिवसांपूर्वी एकमेकांवर चिखलफेक करणारे नेते हेच का असा प्रश्न यावेळी अनेकांना पडला होता.
बॅनर वरून कलगीतुरा : कार्यक्रमाच्या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते बॅनरचे अनावरण करण्यात आले. बॅनर वर एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला होता. तर खाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचा फोटो लावला होता. गिरीश महाजन हे पडदा बाजूला करत असताना मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यावर पडदा होता. तो बाजूला करण्यासाठी अनेक वेळा तो ओढवा लागला. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला. यावर रावसाहेब दानवे यांनी, 'मुख्यमंत्र्याचा चेहरा झाकलेला होता. मी त्यांना सांगितलं की किमान त्यांचा चेहरा तर मोकळा करा, असा मिश्किल टोला लगावला.