औरंगाबाद - आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टोलेबाजी केली. दोघांच्या भेटीचे व आतापर्यंतचे व्हिडिओ लोकच लावतील, सोशल मीडियावर आता "लाव रे व्हिडिओ" सुरू होईल असे म्हणत राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला.
सोशल मीडियावर "लाव रे तो व्हिडिओ" होईल सुरू केंद्राचे राज्यावर विशेष प्रेम -
ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारने जनगणना केली असून त्यांच्याकडे तो सर्व डेटा आहे. आम्ही वारंवार मागणी करूनही ते देत नाहीत. भाजपची सत्ता राज्यात नसल्याने त्यांचे राज्याबाबत अधिक प्रेम उतू जात असल्याचा खोचक टोलाही वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला डेटा देण्याबाबत आदेशीत केल्यावर डेटा लवकर मिळेल. आगामी तीन महिन्यात हा डेटा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ओबीसी आयोगाने त्यासाठी काम सुरू केले आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट सांगितले.
औरंगाबादेत पार पडली बैठक -
मागास व आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळण्यासाठी शिष्यवृत्त्या, शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षण, इंग्रजी शाळेतील प्रवेशाबाबत तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्त्यांचे प्रस्ताव पाठविण्यासाठी काटेकोर तपासणी करण्याचे आदेश इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी औरंगाबादेत दिले. आश्रम शाळेच्या व विभागातील आपत्ती व्यवस्थापन आढावा विषयक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उपायुक्त पराग सोमण, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख, औरंगाबादचे सहायक आयुक्त पी.जी.वाभळे, बीडचे सहायक आयुक्त सचिन मडावी, जालन्याचे सहायक आयुक्त अमित घवले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.एम. केंद्रे, सहायक संचालक शि.बा.नाईकवाडे, लेखा अधिकारी डॉ. सुधीर चाटे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा -Delta Variant : नाशिक जिल्ह्यात आढळले डेल्टा व्हेरिएंटचे 30 रुग्ण
मागास विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह -
विभागीय आयुक्तांना महाज्योतीच्या विभागीय कार्यालयासाठी तात्काळ जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश वडेट्टीवार यांनी दिले. बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांच्या मुलांच्या शाळेचा आढावा ही यावेळी त्यांनी घेतला. तसेच, इंग्रजी भाषेतील परिपूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळेत इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाच्या सहकार्याने पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित व्हावा जेणेकरुन इंग्रजी माध्यमाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळेल. यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी समाज कल्याण विभागामार्फत करावी असे आदेशही यावेळी अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ठिकाणी इतर मागास प्रवर्गातील 100 विद्यार्थी संख्येचे वसतिगृह तातडीने उभारण्याबाबत जागा आणि सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशही संबंधितांना वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.
हेही वाचा -Political Analysis : दिल्लीतील वाढलेल्या राजकीय गाठीभेटींचा नेमका अर्थ काय?