औरंगाबाद - जिल्ह्यातील वैजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात सोमवारी सकाळी दिलेल्या जेवणात चक्क अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थिनींनी हे जेवण घेऊन थेट तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार विनोद गुंडमवार यांना हे अळ्यायुक्त जेवण दाखवून न्याय देण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली. तसेच तहसीलदार यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचत न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही या विद्यार्थिनींनी दिला.
शिवराई रस्त्यावर गायकवाड वाडी परिसरात समाज कल्याण विभागाचे मुला-मुलींसाठी २ स्वतंत्र वसतिगृह आहेत. मुलींच्या वसतिगृहात ग्रामीण भागातील जवळपास ८० विद्यार्थिनी राहतात. या वस्तीगृहातील मुलींना मुलभूत सुविधा मिळत नसून येथे कायमस्वरूपी गृहपाल उपलब्ध नाहीत तर, रात्रीच्या वेळी पुरुष सुरक्षारक्षक असतात. तसेच अनेक दिवसांपासून दररोज निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना कळवूनही ते लक्ष देत नव्हते. त्यामुळे काही समस्या उद्भवल्यास मुली त्या सांगू शकत नाही. तसेच इतरही अनेक सुविधा वसतिगृहात मिळत नसल्याचे विद्यार्थिनींनी यावेळी सांगितले.