औरंगाबाद- आजारी बहिणीला पाहण्यासाठी नाशकातील मालेगावला गेलेल्या विपणन प्रतिनिधीचे घर फोडून चोरांनी पावणेचार तोळे सोने, 25 हजारांची रोकड आणि 235 ग्रॅम चांदीचे दागिने, असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना 15 ते 16 ऑगस्ट दरम्यान गारखेडा परिसरातील मल्हार चौकात घडली.
औरंगाबादेत घर फोडून दागिने अन् रोकड लंपास
आजारी बहिणीला पाहण्यासाठी गेलेल्या एकाचे घर फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
एका कंपनीत विपणन प्रतिनिधी असलेले विजय उत्तमराव पाटील (54 वर्षे, रा. रो-हाऊस क्र. 12, सक्सेस विहार, मल्हार चौक) हे 15 ऑगस्टला सकाळी आठच्या सुमारास कुटुंबियांसह चारचाकीने मालेगाव येथे आजारी बहिणीला पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर 16 ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास पाटील कुटुंबिय परतले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. त्यामुळे पाटील यांनी घरात जाऊन पाहिले. तेव्हा मधल्या खोलीतील लोखंडी कपाटातून 15 ग्रॅमचे शॉर्ट गंठण, प्रत्येकी 5 ग्रॅमचे कानातील झुबे, नाकातील तुकडा, 2 ग्रॅमचे कानातील रिंग, 10 ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, 25 हजारांची रोकड, दिडशे ग्रॅमचे चांदीचे फुलपात्र, 20 ग्रॅमचा चांदीचा चमचा, 50 ग्रॅमची चांदीची अत्तरदाणी आणि 15 ग्रॅमचे चांदीचे शिक्के, असा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
याबाबत विजय पाटील यांच्या तक्रारीवरुन सोमवारी (दि. 17 ऑगस्ट) रात्री पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहेत.