छत्रपती संभाजीनगर Kojagiri Pournima २०२३ : सर्वत्र कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी केली जात असताना, मात्र ग्रहणामुळे दूध विक्रीला ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा जवळपास चाळीस हजार लिटर अतिरिक्त दूध विक्रीला ब्रेक लागण्याची माहिती दूध संघ विक्री व्यवस्थापक विजय कूंदे यांनी दिली.
कोजागिरी पौर्णिमेला अटणार नाही दूध? : कोजागिरी पौर्णिमा म्हणलं की, रात्री बाराला चंद्राला नैवेद्य दाखवण्यासाठी दूध आटवल जातं. या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाची मेजवानी पाहायला मिळते. प्रत्येक कॉलनी परिसरात नागरिक एकत्र येतात आणि दूध आटवून रात्री बारापर्यंत मनसोक्त कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात. चंद्राला रात्री बाराच्या सुमारास नैवेद्य दाखवून, दूध प्राशन करत आगळावेगळा सण साजरा केला जातो. मात्र यंदा चंद्रग्रहण (Chandra Grahan) असल्यानं दूध आटवायच नाही असा पवित्र नागरिकांनी घेतलाय. दूध महासंघाच्या वतीनं दिलेल्या माहितीनुसार, दररोज 35 ते 40 हजार लिटर दुधाची विक्री होत असते. तर कोजागिरीला ही विक्री दुपटीने वाढते. एक दिवस आधीच दुधाची बुकिंग केली जाते. मात्र यंदा अवघे दोन टक्के इतकीच विक्री वाढली आहे. अनेक लोकांनी यंदा दूध नको, असा पवित्रा घेतलाय. त्यामुळे खूप नुकसान या निमित्तानं होत असल्याची मत जिल्हा सहकारी दूध संघ वितरण व्यवस्थापक विजय कुंदे यांनी व्यक्त केलं आहे.
सोशल मीडियावरील माहितीने वाढला संभ्रम :यंदा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) दोन्ही एकाच दिवशी आले आहेत. याबाबत गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती प्रसारित केली जात आहे. त्यात ज्योतिषी, अभ्यासक, शास्त्रज्ञ यांनी आपली वेगवेगळी मत मांडली आहेत. मात्र या सर्वांमुळे मोठा संभ्रम सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालाय. काही अभ्यासकांच्या मते चंद्रग्रहण रात्री एक ते अडीच या दरम्यान असेल, त्यामुळे दूध तयार करण्यास अडचण नाही असं सांगितलं. काहींनी दूध तयार करा, मात्र ते प्रसाद स्वरूपात घ्या आणि उर्वरित दुसऱ्या दिवशी सकाळी घेतलं तरी चालेल असं सांगितलं आहे. तर काहीजणांनी ग्रहण मध्यरात्री असलं तरी, त्याचे वेध 28 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजल्यापासून चालू होतात. त्यामुळे दूध पिऊ नका अशा पद्धतीचा मजकूर समाज माध्यमांवर टाकला आहे. या सर्वांमुळे नेमकं कुणाचं बरोबर हे कळायला मार्ग नाही, अशा परिस्थितीत नागरिकांनी यंदा कोजागिरीला दूध तयार करायचं नाही अशी भूमिका घेतल्याचं दूध विक्रीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
असे असेल ग्रहण : शनिवारी रात्री कोजागिरी साजरी होत असताना, मध्यरात्री १.०५ ते २.२३ दरम्यान चंद्रग्रहण असणार आहे. या काळात धार्मिक रीतीनुसार अनेक पथ्य पाळण्याच्या सूचना काही ज्योतिषांनी दिल्या आहेत. ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांच्या नुसार, ग्रहण जरी मध्यरात्री होणार असलं तरी त्याचे वेध शनिवार दुपारी तीन वाजेपासून सुरू होतील. या काळात अन्नग्रहण करणे म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात जाण्यासारखं असेल. ज्यांना काही त्रास आहे किंवा लहान मुलं आहेत अशाच लोकांनी या काळात मर्यादित अन्न ग्रहण करावे. अन्यथा इतरांनी तसं करू नये. ग्रहणाचा काळ नकारात्मक ऊर्जा घेऊन येतो त्यामुळे या काळात बाहेर न पडता घरात राहावे, आपल्या घरातील अन्न-पाणी झाकुन ठेवावे, तर मध्यरात्री ग्रहण संपल्यावर स्नान करावे.