छत्रपती संभाजीनगर :अधिक मास असल्याने श्रावण महिण्याबाबत अनेक संभ्रम सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाले आहेत. दोन महिन्याच्या काळात नेमकी पूजा कशी असावी, उपवास कसे करावे? याबाबत मत-मतांतरे पाहायला मिळतात. मात्र दोन्ही महिने वेगवेगळे आहेत. त्यातील धार्मिक पूजा परंपरा वेगवेगळ्या आहेत, याबाबत कुठलाही संभ्रम ठेवण्याची गरज नसल्याचे मत अध्यात्मिक अभ्यासक सुरेश जोशी गुरुजी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले आहे.
'म्हणून' येतो अधिकमास :दर तीन वर्षांनी अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना येत असतो. त्याला अध्यात्मिक कारणासोबतच वैज्ञानिक कारण देखील असल्याची माहिती अध्यात्मिक अभ्यासक सुरेश जोशी गुरुजी यांनी दिली. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना त्याचे पूर्ण पर्व 355 दिवसात पूर्ण होते. आपण मान्य करत असलेले वर्ष 365 दिवसांचे असते. दरवर्षी दहा दिवसांची तूट या फेऱ्यांमध्ये येत असते. त्यामुळे दर तीन वर्षांनी असलेली ही तूट अधिक मास पूर्ण करतो. हा विशेष महिना म्हणून आपण साजरा करतो, या काळात चंद्राची परिक्रमा दोनदा मोजली जाते. या महिन्यात दानधर्म करण्याची प्रथा आहे. यामध्ये गोरगरिबांना, अध्यात्मिक कार्य करणाऱ्यांना दान दिले जाते. तसेच घरच्या जावयाला देखील भेटवस्तू देऊन पुण्य कमावले जाते, अशी माहिती सुरेश जोशी गुरुजी यांनी दिली.