महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौतुकास्पद ! रुग्णांना मोफत जेवण देणारा 'अन्नदाता'; 'त्या' घटनेमुळे केली सुरुवात

औरंगाबादेतील हेडगेवार रुग्णालयात तब्बल ८०० रुग्णांना मोफत जेवण दिले जाते. गेल्या ८ वर्षांपासून याच रुग्णालयातील सेवानिवृत्त खिवंसरे काका रुग्णांची भूक भागवतात. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णालय देखील काकांच्या कार्याला सलामी ठोकतात.

खिवंसरे काका रुग्णांना मोफत जेवणे देताना

By

Published : Sep 2, 2019, 10:46 AM IST

Updated : Sep 2, 2019, 3:14 PM IST

औरंगाबाद -हेडगेवार रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. त्यापैकी बरेचसे रुग्ण बाहेरून उपचारासाठी दाखल होतात. त्यावेळी जवळच कोणी नसल्याने रुग्णाला आणि नातेवाईकांना जेवणासाठी खाणावळ किंवा हॉटेल शोधव लागते. मात्र, अशा रुग्णांसाठी गेल्या ८ वर्षांपासून खिवंसरा काका मोफत जेवण देतात. त्यामुळे या रुग्णांना त्यांचा खूप फायदा होतो.

औरंगाबादेतील हेडगेवार रुग्णालयात रुग्णांना मोफत जेवण,बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट

राजकुमार खिवंसरा काही वर्षांपूर्वी हेडगेवार रुग्णालयातील रक्तपेढीत काम करत होते. त्यावेळी एका रुग्णाला जेवण मिळाले नसल्याने ते उपाशी असल्याचे त्यांना दिसून आले. काकांनी दुसऱ्या दिवशीपासून त्या रुग्णासाठी घरून मोफत डबा आणून दिला. त्यांच्या डब्यामुळे त्या रुग्णाला मोठा दिलासा मिळाला. त्यावेळी त्यांनी अनुभवले की अनेक रुग्णांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यादिवशी त्यांनी होईल तितक्या लोकांच्या मोफत जेवणाची सोय केली. त्यांचे हे काम पाहून अनेक मदतीचे हात त्यांना जोडले गेले. दानशूर व्यक्तींच्या मदतीने काका रोज तीन वेळा 800 लोकांना मोफत जेवणाचे वाटप करतात. ही मदत हळूहळू वाढत असल्याचे खिवंसरा काका सांगतात.

हेडगेवार रुग्णालयाला काकांचे कौतुक -
काकांच्या मदतीला रुग्णालयातील सेवावृत्ती देणाऱ्या व्यक्ती जोडल्या गेल्या आहेत. काका देत असलेले जेवण हे उत्तम प्रतीचे साजूक तुपातले असते. आपण घरी देखील खाणार नाही इतके चांगले जेवण काका देतात. त्यांच्या या कार्याने रुग्णांना मोठी मदत होते. त्यामुळे त्यांचे कार्य पुन्हा वाढावे, अशी मनोकामना डॉ. अनंत पंढेरे यांनी व्यक्त केली. तसेच खिवंसरा काका हेडगेवार रुग्णालयाचे भूषण असल्याचे ते म्हणाले.

सेवानिवृत्त झाल्यानंतरही रुग्णांप्रती आपुलकी-
काही वर्षांपूर्वी खिवंसरा काका हेडगेवार रुग्णालयातून सेवानिवृत्त झाले. मात्र, रुग्णांविषयी त्यांना वाटणारी आपुलकी आणि काळजी आजही तशीच आहे. त्यामुळे रुग्णांना मोफत जेवण देण्याचा वसा खिवंसरा काका नावाने प्रचलित असणाऱ्या या वृद्ध माणसाने उचलला आहे. त्यामधून दररोज 700 ते 800 रुग्णांची भूक भागत असते. त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक काकांच्या या उपक्रमाचे कौतुक करतात. काकांकडून जेवण मिळाले नसते, तरी आमच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली असती, असे रुग्ण सांगतात.

Last Updated : Sep 2, 2019, 3:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details