औरंगाबाद - येत्या १० जानेवारीपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबाद येथे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाची कार्यक्रमपत्रिका शुक्रवारी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिक ठाले-पाटील आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली. यंदाच्या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संमलेन अराजकीय व्यासपीठ असणारे संमेलन ठरणार आहे. या संमेलनाच्या उद्धघाटन आणि समारोप या दोन्ही कार्यक्रमात व्यासपीठावर राजकीय व्यक्ती असणार नाही. मात्र, साहित्य संमेलनाचे निमंत्रण हे सर्वांना आहे. मराठी साहित्याचा आणि साहित्यिकांचा हा सोहळा आहे, असे ठाले यांनी सांगितले. येत्या १०, ११ आणि १२ जानेवारी असे ३ दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धो. महानोर हे करणार असून समारोप ज्येष्ठ कथा-कादंबरीकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. संमेलनात वाङ्मयीन व सामाजिक प्रश्नांवर ५ परिसंवाद, प्रतिभा रानडे यांची प्रकट मुलाखत, निमंत्रित कवीची दोन कविसंमेलने, कथाकथन, महात्मा ज्योतीराव फुले यांच्या 'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथावर अभ्यासकांची परिचर्चा तसेच आजच्या ५ लक्षवेधी कथाकारांशी अरविंद जगताप व राम जगताप यांचा प्रकट संवाद, बालसाहित्यिकांचा मुलांशी संवाद साधणारा ‘बालमेळावा', बालाजी सुतार यांच्या 'गावकथा' या नाटकाचा प्रयोग आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम, असे भरगच्च कार्यक्रम आखले आहेत. याशिवाय ज्येष्ठ व श्रेष्ठ कथाकार भास्कर चंदनशिव, दिल्ली येथे चहा विकून चरितार्थ चालवणारे मूळ अमरावती जिल्ह्यातील मान्यवर मराठी भाषक हिंदी साहित्यिक लक्ष्मणराव (चहावाले) आणि श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाच्या प्रकाशक सुमती लांडे यांचा त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल संमेलनात जाहीर सत्कार करून गौरव करण्यात येणार आहे.