औरंगाबाद -कोरोनाचा वाढता धोका पाहून, कन्नड तालुका पंचायत कृषी विभागाने आणि कृषी निविष्टा असोसिएशनने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी शेतकऱ्यांना खत थेट बांधावर देण्याचा उपक्रम आखला आहे. या उपक्रमाची सुरुवात कन्नड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार उदयसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आली.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची अडचण ओळखून कन्नड पंचायत कृषी विभागाने आणि कृषी निविष्टा असोसिएशनने शेतकऱ्यांना थेट बांधावर खत आणि बियाणे उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम आखला. या उपक्रमात रविवारी १७५ मेट्रीक टन खत शेतकऱ्यांना थेट बांधावर देण्यासाठी पाठवण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून ६९६.९४ मेट्रीक टन खत शेतकऱ्यांना बांधावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कन्नड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, बियाणे आणि खताने भरलेल्या गाड्यांना आमदार उदयसिंग राजपूत यांनी हिरवी झेंडा दाखवला. यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्धव विधाते, तहसीलदार संजय वारकड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी पी. आर. चव्हाण, गटविकास अधिकारी वेनेकर, पंचायत समिती सभापती आप्पाराव घुगे, व्यापारी राजुदादा खंडेलवाल आदींची उपस्थिती होती.