छत्रपती संभाजीनगर: स्वत:च्या लग्नासाठी येत असताना नवरदेवावर हल्ला करण्यात आला आहे. लग्न जुळले, तारीख ठरली, पाहता पाहता वऱ्हाड लग्नासाठी मुलीच्या गावात दाखल झाले. मात्र लग्नाच्या एक दिवस आधी अज्ञात आरोपीने शास्त्रज्ञ असलेल्या नवरदेवाला रस्त्यात अडवत बेदम मारहाण केली. यात त्याला गंभीर दुखापत झाली. मंडपात जाण्याऐवजी वर रुग्णालयात पोहचला. ही धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यात घडली. या घटनेत संशयितांची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुलगा आहे वैज्ञानिक: श्रीहरी कोटा येथील इस्रो संस्थेत काम करत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पंकज कदम या वैज्ञाकीचा विवाह परभणी येथील युवतीशी ठरला. विवाह 9 मे रोजी करण्याचे ठरले होते. हळद आणि नंतर लग्न असा समारंभ घेण्याचे नक्की करण्यात आले. त्यासाठी नवरदेव आपल्या नातेवाइकांसह परभणी येथे येत असताना रस्त्यात त्याच्या वाहनावर तीन दुचाकीवर आलेल्या अज्ञात आरोपींनी हल्ला केला. परभणी वसमत रस्त्यावर हा हल्ला झाला. यात पंकज कदम याला गंभीर दुखापत झाली. लग्न मंडपात जाणारा नवरदेव रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत पोहचला.