औरंगाबाद -एखाद्या राजकीय पक्षाशी निष्ठा आणि श्रद्धा असणारे अनेक उदाहरण पाहायला मिळतात. असच एक उदाहरण औरंगाबादेत दिसून आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या एका युवाशिवसैनिकाने शिवसेनेचा मुख्यमंत्री होईपर्यंत दाढी करणार नाही, असा निर्धार केला आहे. मागील तीन वर्षांपासून त्याने पूर्ण दाढी केलेली नाही. हर्षवर्धन त्रिभुवन, असे या शिवसैनिकाचे नाव आहे.
हेही वाचा-भाजप जिल्हाध्यक्षाच्या 'त्या' वक्तव्याबद्दल उदयनराजेंनी मागितली मुस्लीम बांधवांची माफी
हर्षवर्धन उच्चशिक्षित युवक आहे. सध्या एका खासगी रुग्णालयात तो काम करतो. कायद्याचं शिक्षण तो घेत आहे. दाढी न करण्याचा निर्धार ही कुठलीही अंधश्रद्धा नसून माझी श्रद्धा आहे आणि लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि मी दाढी करेन, असा विश्वास हर्षवर्धनने व्यक्त केला.
हर्षवर्धन त्रिभुवन शिवसैनिक आहे. लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव त्याच्यावर आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच दाढी कापेन, असा निर्धार त्याने केला. तीन वर्षांपूर्वी 27 नोव्हेंबर रोजी हर्षवर्धनने स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईपर्यंत पूर्ण दाढी काढणार नाही, असा निर्धार केला. आरशात बघताना वाढलेली दाढी पाहून शिवसेना मजबूत करण्याची आठवण येत राहील. म्हणून हा निर्धार केला असल्याचं हर्षवर्धनने सांगितलं आहे.
दाढी वाढवत असताना अनेकांनी टिंगल उडवली, गम्मत घेतली, घरी देखील अनेक अडचणी आल्या. मात्र, घेतलेला निर्धार मागे घेत नाही ही शिकवण बाळासाहेबांची आहे. त्यामुळे केलेला निर्धार मोडला नाही. आज राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे मी आनंदी असून ज्या दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, त्यादिवशी पूर्ण दाढी करेन, असा विश्वास हर्षवर्धन याने व्यक्त केला.