महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस ठाण्यामध्ये भरली शाळा, 'कम्युनिटी पोलिसिंग'द्वारे अभिनव उपक्रम

कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर पोलीस ठाणे परिसरात राहणाऱ्या गरीब मुलांसाठी इंग्रजी भाषेचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. इंग्रजी भाषेचे तज्ज्ञ एस.पी जवळकर हे विशेष वर्ग घेत आहेत. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर पंधरा दिवसांसाठी 12 विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.

By

Published : Dec 31, 2020, 9:37 PM IST

औरंगाबाद
औरंगाबाद

औरंगाबाद - पोलीस ठाणे म्हणले तर तिथे गुन्हेगारांचा वावर, असे चित्र उभे राहते. मात्र, औरंगाबादच्या पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये सध्या लहान मुलांचा वावर दिसून येतोय. कारण आता पोलीस ठाण्यामध्येदेखील शाळा भरू लागली आहे. गरीब मुलांसाठी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे.

औरंगाबाद

पोलीस ठाण्यात इंग्रजी भाषेचे वर्ग...

कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर पोलीस ठाणे परिसरात राहणाऱ्या गरीब मुलांसाठी इंग्रजी भाषेचे क्लास सुरू करण्यात आले आहेत. इंग्रजी भाषेचे तज्ञ एस.पी जवळकर हे विशेष वर्ग घेत आहेत. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर पंधरा दिवसांसाठी 12 विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. सकाळी नऊ ते अकरा या दोन तासांमध्ये पोलीस ठाण्याच्या इमारतीत हे विशेष वर्ग भरवले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची भीती निघून जावी, त्यांना भाषा शिकण्याची गोडी लागावी याकरिता प्रयत्न करत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.

भाषा शिकण्यासाठी विशेष उपक्रम....

विद्यार्थ्यांना भाषा शिकणे तसे अवघड असते. त्यात कुठल्याही प्रकारचे वर्ग लावणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना नवीन भाषा शिकवताना वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो. फळ्यावर अक्षर गिरवून शिक्षण न देता वास्तववादी शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. भाजीपाल्यांची नावे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी बाजारातून भाजीपाला विकत आणला जातो. त्या भाज्यांवर विद्यार्थ्यांच्या हाताने इंग्रजीमध्ये भाज्यांची काय नाव आहे? ते लिहिले जातात आणि त्याची खरेदी करताना, इंराजीत भाज्यांची नाव काय आहेत, त्याचा उच्चार कसा असतो? अशा पद्धतीने आगळेवेगळे शिक्षण या मुलांना दिले जाते. या माध्यमातून त्यांना मिळालेले शिक्षण त्यांच्या कायम स्मरणात राहील असा विश्वास इंग्रजी भाषेचे शिक्षक एस जवळकर यांनी व्यक्त केला.

अभ्यासासोबत स्वयंशिस्त शिकवण्याचा प्रयत्न....

पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आलेल्या विशेष वर्गात विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे धडे शिकवले जात आहेत. मात्र, त्याचबरोबर स्वयंशिस्त देखील या विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. कसं राहायचं, आपली काळजी कशी घ्यायची, स्वच्छता कशी ठेवायची, आपले कपडे कसे असावे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थी आल्यावर त्यांचे कपडे व्यवस्थित नव्हते. काहीजणांनी आंघोळ केली नव्हती. तर काही बेशिस्तपणे बसलेले होते. मात्र या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वयं शिस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि तीन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मोठा बदल दिसून आला. विद्यार्थ्यांना भाषेची गोडी लागली तर ते पुढे त्यात प्रगती करू शकतात. त्यामुळे असे उपक्रम राबवले जावेत असं मत एस. पी. जवळकर सरांनी व्यक्त केलं.

विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला आनंद

इंग्रजी भाषा शिकताना त्या भाषेची भीतीच अधिक आहे. पोलिस ठाण्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या विशेष वर्गात बारा विद्यार्थी इंग्रजी भाषेचे धडे घेत आहेत. सहा दिवसांपासून हे विशेष वर्ग भरवले जात आहेत. आधी इंग्रजी भाषेची भीती वाटत होती. आपण कसं बोलावं, भाषा कशी शिकावी, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनां होते. मात्र गेल्या सहा दिवसात या विद्यार्थ्यांना आता भाषा शिकण्याचा आनंद भेटू लागलाय. इथे आल्यावर अनेक शब्दांचे योग्य उच्चार समजू लागले आहेत. दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारे इंग्रजी भाषेतील शब्द आता सहजरित्या बोलता येत आहेत. त्यांचे अर्थ समजू लागले कोणत्या वस्तूला काय शब्द आहे. याबाबत माहिती मिळाल्याने निश्चित आम्हाला आनंद होत असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

उपक्रम यशस्वी झाला तर भविष्यात गणिताचे विशेष वर्ग...

कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत अभिनव उपक्रम राबवला जात आहे. प्रायोगिक तत्वावर असलेला हा उपक्रम 15 दिवसांसाठी आयोजित केला आहे. विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला तर, हा उपक्रम अजून दोन ते तीन महिन्यासाठी वाढवला जाणार आहे. या उपक्रमाचा एकंदरीतच निकाल पाहून आगामी काळात गणित भाषेचे विशेष वर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचं मत सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी व्यक्त केलं. स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी आणि गणित या भाषांविषयी अनेकांना अडचणी असतात. त्या अडचणी जर दूर झाल्या तर गरीब कुटुंबातील मुले देखील चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतात त्यामुळे हा उपक्रम राबवण्याचा देखील सोनवणे यांनी सांगितले. औरंगाबादेत सुरू झालेल्या विशेष वर्गाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

ABOUT THE AUTHOR

...view details