औरंगाबाद - राज्यभर गाजलेल्या २००६ मधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती घोटाळ्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सुरेश पाटील, माजी खासदार व माजी अध्यक्ष रामकृष्णबाबा पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, संदिपान भुमरे, नितीन पाटील यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आणि इतर ३२ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम. भोसले यांनी दिले.
भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने २००६ मध्ये कर्मचारी भरती करण्यात आली होती. यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आणि लाचखोरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबादचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक किशोर कांबळे यांच्या फिर्यादीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात २००७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात अॅड. के.जी. भोसले, अॅड. अभयसिंग भोसले, अॅड. सचिन शिंदे, अॅड. एस. के. बरलोटा, अॅड. अशोक ठाकरे, अॅड. उमेश रूपारेल आदींनी काम पाहिले.