छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) India vs Bharat Naming Issue : इंडिया आणि भारत नावावरून सध्या राजकीय वाद सुरू झालाय. मात्र, देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील असाच वाद निर्माण झाला होता. तेव्हा इंडिया नावासाठी मतदान घेण्यात आलं होतं, अन् नावावर शिक्कामोर्तब झालं. संविधानातील पहिलंच कलम दोन्ही नाव एकच असल्याचं सांगतंय. त्यावेळी फाळणीची मागणी करणारे मोहम्मद अली जिना यांनी हे नाव वापरू नका, असं मत व्यक्तव्य केलं होतं. आज जर देशाचं नाव 'भारत' करण्याचा प्रस्ताव घेऊन घटनेत दुरुस्ती केली, तर 'इंडिया' हे नाव पाकिस्तान घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मत राजकीय विश्लेषक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलंय.
इंग्रजांनी दिलं होतं नाव :भारत आणि इंडिया (India vs Bharat) या दोन्ही नावांना जुना इतिहास आहे. पुराणांमध्ये भारत वर्ष म्हणून उल्लेख आहे. ऋग्वेदात दसराजन वारमध्ये भारत जातीय समाजाच्या राजाचा विजय झाला. तेव्हापासून या नावाचा उल्लेख होतोय. तर हिमालयाच्या खालच्या बाजूला किंवा सिंधू नदीच्या दक्षिणेला असलेला भाग 'इंडस' म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर इंग्रजांनी 17-18 व्या शतकाच्या दरम्यान देशाला इंडी किंवा इंडिया, इंडस अशी ओळख दिली. त्यानंतर देश स्वतंत्र झाल्यावर संविधान तयार होत असताना या विषयावर चर्चा झालीय. त्यात संविधान सभेत एस. व्ही. कामत यांनी 'भारत' हे नाव कायम ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर अनेक मतमतांतरे समोर आली. इंडिया नाव ठेवावं का नाही, यावर मतदान झालं. त्यात 51 विरोधी 38 मतांनी नाव कायम ठेवण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. त्यात संविधानात कलम नंबर एकमध्ये भारत म्हणजेच इंडिया असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे सरकारनं भारत हे नाव वापरलं, तर त्यात कुठलीही चूक नाही. जर संविधानामधूनच ठराव घेऊन नाव कायमस्वरूपी हटवलं, तर मात्र तो प्रश्न निर्माण होऊ शकतो असं मत राजकीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त (Political analyst Dr Satish Dhage Reaction) केलंय.
म्हणून ठेवलं 'इंडिया' नाव कायम :जगात भारत देशाला एक वेगळ महत्त्व प्राप्त आहे. जगात प्रत्येक क्षेत्रात 'इंडिया' हेच नाव वापरून जागतिक पातळीवर देशानं आपलं नाव उंचावलय. मात्र आज इंडिया आणि भारत या नावावरून राजकारण चांगलंच तापलंय. आता भारत हे नाव वापरण्याकडे केंद्र सरकारचा कल दिसून येतोय. मात्र संविधान तयार करत असताना देखील भारत नाव जगासमोर आणावं, असं वाटत असताना इंडिया हे नाव सुद्धा ठेवण्यात आलं. त्यामागे एक वेगळा विचार होता. इंग्रजांनी जगभरात देशाची इंडिया नावानं ओळख पुढे नेली. ही ओळख सहजासहजी पुसून भारत नावानं ओळख निर्माण करणं अवघड गेलं असतं. त्यात खूप मोठा काळ निघून गेला असता. त्यामुळंच संविधान सभेत भारतासोबत इंडिया या नावाला देखील मान्यता देण्यात आली होती. इंग्रजांनी दिलेलं हे नाव असलं, तरी हे पुढे वापरावं असं मंजूर करण्यात आलं होतं. मात्र आज देश अमृत काळापासून पुढं जातोय. त्यामुळे त्याची जुनी ओळख निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असं मत राजकीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त (India vs Bharat Naming Issue Political analyst) केलंय.