गंगापूर (औरंगाबाद)छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तीन टन वजनाच्या भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण गंगापूरच्या शिवतीर्थ उद्यानात, महंत रामगिरी महाराज, शाक्यपुत्र अमृतानंद बोधी, फादर विल्फ़्रेंड सल्डाना, युसुफ मौलाना यांच्या हस्ते सायंकाळी आठ वाजता करण्यात आले.
ब्रांझ धातूपासून तयार केला पुतळा
शिवतीर्थ उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी नगरपालिकेने विशेष ठरवाद्वारे काही दिवसांपूर्वी मान्यता घेतली होती. नाविन्यपूर्ण योजनेतून १ कोटी २२ लाख, तर नगरपालिकेच्या खात्यातून २७ लाखांचा निधी या पुतळ्याच्या उभारणीसाठी वापरण्यात आला आहे. ब्रांझ धातूपासून बनवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ तीन टन वजनाच्या या पुतळ्याचा चबुतरा १८ फूट तसेच उंची ११ फूट आहे.जिल्ह्यातील मोजक्या पुतळ्यात याचा समावेश असेल. कला संचालनालयाने याची पाहणी करून ' कलात्मक पुतळा' असा उल्लेख आपल्या पत्रात केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण गंगापूर शहराच्या वैभवात भर
शहरातील शिवतीर्थ उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याने गंगापूर शहराच्या वैभवात भर पडणार असून, महाराष्ट्रभर पुतळे बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या खुलताबादच्या साळुंखे दाम्पत्याने सहा महिन्यांत हे आकर्षक शिल्प साकारले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पामुळे उद्यानाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून, यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील यांनी दिली आहे. यावेळी आमदार प्रशांत बंब, आमदार अंबादास दानवे, माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक किरण पाटील डोनगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.