औरंगाबाद -जिल्ह्यातील चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या एका आश्रमात प्रियशरण महाराजांवर हल्ला झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रियशरण महाराजांवर बुधवारी रात्री अज्ञात सात ते आठ जणांनी हल्ला केला होता. या घटनेप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या हल्ल्यात महाराजांच्या खांद्याला जखम झाली आहे.
अशी घडली घटना
बुधवारी रात्री मागील दरवाजा तोडून सात ते आठ अज्ञातांनी आश्रमाच्या इमारतीत प्रवेश केला. खोलीत असलेल्या एका महिलेला धमकावत महाराज कुठे आहे, अशी विचारणा केली, तिने घाबरून महाराज वरच्या मजल्यावर असल्याची माहिती दिल्यानंतर, हल्लेखोरांनी तिकडे आपला मोर्चा वळवला. महाराज झोपले असताना त्यांना उठवत जबर मारहाण करण्यात आली. महाराजांनी प्रतिकार केला, मात्र या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही
प्रियशरण महाराजांवर चाकूने वार आणि मारहाण करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हल्ला करणाऱ्यांनी कुठल्याही वस्तूला हात लावला नाही, कुठल्या प्रकारची चोरी केली नाही. यामुळे झालेला हल्ला चोरीच्या नाही तर अन्य उद्देशाने करण्यात आल्याची शक्यता आहे.