औरंगाबाद- कन्नड तालुक्यात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. वनविभागाचे याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या वृक्षतोडीला वरदहस्त कोणाचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कन्नड तालुक्यातून रोज किमान एक ट्रक भरून लाकडं बाहेर गावी जात आहेत. या सर्व प्रकाराकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप वन्यमित्रांनी केला आहे.
कन्नड तालुक्यात अवैध वृक्षतोड सुरू हेही वाचा -औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची वर्णी
कन्नड तालुक्यात मुंडवाडी,जेहूर,पेडकवाडी, अधानेर, कोळवाडी, मुंगसापूर या परिसरात व्यापारी हे कडूलिंब, बाभूळ या झाडांची प्रशासनाकडून परवानगी न घेताच तोड केली जात आहे. याकडे मात्र वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, याबाबत वरिष्ठांसोबत चर्चा करून प्रतिक्रिया देतो, अशी माहिती कन्नडचे वनअधिकारी काजी यांनी दिली आहे. त्यामुळे या वृक्षतोडीला आशीर्वाद कोणाचा, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे वन्यमित्रांनी सांगितले.