औरंगाबाद :औरंगाबादच्या रुग्णालयात आधुनिक काळातील सावित्री पाहायला मिळाली. आपले आयुष्य राहील की नाही, याबाबत भीती न बाळगता तिने आजारी नवऱ्याला जीवनदान दिले. बीड जिल्ह्यातील 48 वर्षीय रहिवासी रुग्ण कापूस व्यापारी आहेत. 2008 मध्ये ते एचआयव्ही बाधीत असल्याचे आढळून आले होते. त्यांच्यावर अँटीरेट्रोव्हायरल थेरपी सुरू करण्यात आली. 2019 मध्ये उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंड निकामी झाल्याचे आढळून आले. त्यांनी 2020 मध्ये मेडिकव्हर रुग्णालयाचे सल्लागार इंटरव्हेंशन नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सचिन सोनी यांच्याकडे उपचारासाठी आले. गेल्या ३ वर्षांपासून होम डायलिसिस वर उपचार घेत होते. पंरतू, त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेल्याने त्यांना अशक्तपणा येऊ लागला होता.
मूत्रपिंड प्रत्यारोपणाची परवानगी :किडनी प्रत्यारोपणाच्या पर्यायावर रुग्णाच्या कुटुंबीयांशी चर्चा करण्यात आली. रुग्णाची ४५ वर्षीय पत्नी ही सुध्दा एचआयव्ही बाधीत होती. ती पतीचा जीव वाचवण्यासाठी किडनी दाता म्हणून पुढे आली. तिचा रक्तगट 'ए' पॉझिटीव्ह तर रुग्णाचा रक्तगट 'बी' पॉझीटीव्ह होता. एचआयव्ही पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सप्टेंबर २०२२ मध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. दाता आणि रूग्ण अशा दोघांच्याही पात्रतेची पुष्टी केल्यानंतर, आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या. औरंगाबाद येथील जिल्हा प्राधिकरण समितीकडून मूत्रपिंड प्रत्यारोपणाची परवानगी घेण्यात आली. १८ जानेवारी २०२३ रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
जगातील पहिली शस्त्रक्रिया :एचआयव्ही संक्रमित पत्नीने एचआयव्हीग्रस्त पतीला किडनी दान केल्याची जगातील पहिलीच घटना असल्याची माहिती, किडनी प्रत्यारोपण करणारे मेडिकव्हर रुग्णालयाचे सल्लागार इंटरव्हेंशन नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सचिन सोनी यांनी दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या टीमने हे यशस्वी प्रत्यारोपण केले. दोघेही रूग्ण एचआयव्ही बाधीत आणि विरोधी रक्तगट असल्याने अशाप्रकारे किडनी प्रत्यारोपण होणारी ही जगभरातील पहिलीच नोंद आहे. पीडित रुग्णाला किडनीच्या आजाराने गेल्या तीन वर्षापासून ग्रासले होते. ते सीएपीडी होम डायलिसिसवर होते. किडनी मिळाल्यास त्यांना नवे जीवनदान मिळणार होते, मात्र नातेवाईक किंवा मित्रपरिवारामध्ये कोणीही दाता मिळाला नाही. त्यावेळी त्यांच्या बाधित पत्नीने किडनी दान करण्यास तयारी दर्शवली. त्यांच्या सर्व चाचण्या झाल्यानंतर सर्व परवानग्या घेत यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. आता दोन्ही रूग्ण बरे असून नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ते त्यांचे दैनंदिन कामकाज सहजतेने करू शकतात, अशी माहिती डॉ. सचिन सोनी यांनी दिली.