औरंगाबाद- उच्चभ्रू वसाहतीमधील एका बंगल्यात आणि रो हाऊसमध्ये अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असलेल्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी वेश्या, दलालांसह 3 ग्राहकांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वेश्या अड्ड्यावर अटक करण्यात आलेल्या ग्राहकांमध्ये प्रोझोन मॉलच्या मॅनेजरचा समावेश आहे. ही कारवाई बीड बायपास रस्त्यावरील उच्चभ्रू वसाहतीत करण्यात आली.
कविता जाधव, उषा ठाकूर (राजपूत) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या 2 महिलांची नावे आहेत. तर हा अड्डा चालवणारा संजय कापसे, ग्राहक घेऊन येणारे अजय साळवे, विनोद नागवणेसह ग्राहकांमध्ये प्रोझोन मॉल मॅनेजर मोहम्मद अर्षद, अमोल शेजुळ, ज्ञानेश्वर गरड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा - आईच्या हत्येमुळे मुले झाली अनाथ; वर्दीतल्या माणसांमुळे मिळाला आधार
मागील अनेक महिन्यापासून अत्यंत गुप्त पद्धतीने बीड बायपास परिसरातील राजेशनगर भागात एका बंगल्यात आणि दुसऱ्या रो-हाऊसमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. यावरून एका पथकाने शनिवारी राजेशनगरमध्ये सापळा रचला. त्यानुसार नंदिनी हॉटेलच्या मागे असलेल्या एका रो-हाऊस मध्ये छापा टाकण्यात आला. यामध्ये संजय कापसे, मोहम्मद अर्षद, अमोल शेजुळ, ज्ञानेश्वर गराड, दलाल अजय साळवे, अड्डा चालवणारी कविता जाधव यांना अटक करण्यात आली. या ठिकाणाहून 3 वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणींची सुटका करण्यात आली.
तर दुसरी कारवाई ही मराठमोळा हॉटेलच्या मागे काही अंतरावर असलेल्या एका बंगल्यात छापा मारून केली. यावेळी नागवणे व उषा ठाकूर-राजपूत यांना ताब्यात घेण्यात आले. तर या ठिकाणाहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका तरुणीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.