कन्नड (औरंहगाबाद) - राज्याच्या समुद्र किनारपट्टी भागात बुधवारी निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली. त्यानंतर वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्याचप्रमाणे कन्नड तालुक्यातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांसह विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले आहे.
अलिबागच्या किनारपट्टीवर बुधवारी निसर्ग वादळाने धडक दिली. तत्पूर्वी राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. कन्नड तालुक्यातही बुधवारी पहाटेपासूनच नाचनवेल, पिशोर, करजखेडा, चिकलठान, हतनूर, देवगाव, नागद, चिंचोली, औराळा-जेहुर आदी भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. काही ठिकाणी रिमझिम पावसाची नोंद झाली तर, रात्री १० वाजल्यानंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वारा आणि पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची तर, विद्यूत वाहिन्यांचे खांब पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
कन्नड तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, वादळी वाऱ्याने नुकसान तालुक्यात पावसामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्यास तत्काळ पंचनामे करून माहिती देण्याचे आदेश तहसीलदार संजय वारकड यांनी प्रत्येक गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना दिले आहेत. पावसामुळे तालुक्यातील विद्युत वाहिन्यांवर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने त्या-त्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर कन्नड तालुका हा गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे बुधवारी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे आंबा उत्पादकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कन्नड मंडळ निहाय पावसाची आकडेवारी
यावेळी कन्नड 38 मिलीमीटर, चापानेर 30 मिलीमीटर, देवगाव 37 मिलीमीटर, चिखलठान 20 मिलीमीटर, पिशोर 25 मिलीमीटर, नाचनवेल 13 मिलीमीटर, करंजखेडा 65 मिलीमीटर, तर चिंचोली 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सरासरी 31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाची सरासरी 35.75 मिलीमीटर इतकी नोंद करण्यात आली आहे.