छत्रपती संभाजीनगर:राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातले असून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे.राज्यात पुढील आठवडाभर अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसेच गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने दर्शवण्यात आली आहे. शहरामध्ये भर दिवसा रात्र असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. काळ्या ढगांनी एकदम शहरांमध्ये भर दिवसा अंधार पडला आहे. समोर असलेली व्यक्ती देखील स्पष्ट दिसेनाशी झाली होती. तर सोसाट्याचा वारा देखील सुटला काही वेळातच दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक बदललेल्या या वातावरणामुळे शहरवासीयांची चांगलीच धावपळ झाली आहे. तर वाहनधारकांना दिवसा वाहनाचे लाईट लावून गाडी चालवावी लागली.
अचानक वातावरणात बदल झाला: दोन दिवसांपासून पाऊस पडेल असे वातावरण होते. मात्र ढग दाटून आले, जोराचा वारा सुटला तरी पाऊस पडला नाही. मात्र सकाळ पासून अचानक वातावरणात बदल झाला आणि दमदार पावसाने हजेरी लावली. तर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार आणि वादळी वाऱ्याच्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे चित्र समोर आले आहे. पत्र्याची घरे असणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.