औरंगाबाद - जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. शुक्रवारी रात्री अचानक आलेल्या वादळी पावसाने वातावरणात मोठा बदल झालेला दिसून आला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळल्याने वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.
शुक्रवारी दुपारी उन्हाचे चटके बसत असताना सायंकाळी अचानक मोठा वारा सुरू झाला आणि अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसायला सुरुवात झाली. हळूहळू पावसाने जोर धरायला सुरुवात केली. पाऊस सुरू असताना हवेचा जोर देखील तीव्र होता. जवळपास 1 ते दीड तास कधी हळू, तर कधी जोरात झालेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. गरम असलेल्या वातावरणात हवेच्या थंड लहरी वाहू लागल्या आहेत.
यावेळी जवळपास 3 मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद एमजीएम वेधशाळेने घेतली आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, कापूस, हरभरा यांच्यासह फळबागांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाड कोसळल्याने वीज पुरवठा 1 ते 2 तास खंडित झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने पडलेली झाडे बाजूला करण्यात आली. तर आणखी 2 दिवस काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उन्हाळा असल्याने उष्णतेमुळे कोरोनाचा संसर्ग थांबेल, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र, वातावरणात झालेला हा बदल चिंता वाढवणारा असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.