औरंगाबाद - जिल्ह्यात बहुतांश सर्वच तालुक्यामध्ये बुधवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाशी लढताना आता जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे.
मराठवाड्याला अवकाळी पावसाचा तडाखा, कोरोनाशी लढताना जास्त खबरादारीची गरज - औरंगाबाद पाऊस बातमी
कोरोनाशी दोन हात करणाऱ्या मराठवाड्यावर आता अवकाळी पावसाच संकट घोंगावत आहे. बुधवारी मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहराचे तापमान वाढले होते. बुधवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. सायंकाळी आठच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस झाला. यादरम्यान अनेक ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. औरंगाबाद शहरासह पैठण, फुलंब्री, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड तालुक्यात काही गावात पाऊस बरसला. हवामान खात्याने २५ ते २८ मार्च दरम्यान मराठवाड्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार बुधवारी मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तापमानात मोठी घसरण झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीपाचे नुकसान झाले होते. आता झालेल्या या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता अजून वाढली आहे. या पावसामुळे गहू, ज्वारी, आंबा, द्राक्ष या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या संकटात आता पावसाच्या संकटामुळे नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागणार हे मात्र नक्की.