औरंगाबाद - सुजय विखे रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी प्रकरणी याचिकर्त्यांनी पोलिसात तक्रार द्यावी. पोलीस त्याचा तपास करतील, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. व्ही घुगे व न्यायमूर्ती बी. यु. देबडवार यांनी सर्व बाबी लक्षात घेऊन याचिकाकर्त्यांना अतिरिक्त तक्रार आणि अतिरिक्त कागदपत्रे पोलीस स्टेशनला देण्याची परवानगी दिली. त्यानंतर तपास अधिकाऱ्याने फौजदारी प्रक्रियेच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
याचिकाकर्त्यांचा दुरूस्ती अर्ज मागे -
याचिकाकर्त्यांनी रिट याचिकेमध्ये दुरुस्ती अर्ज दाखल केला होता. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीच्या आधारे राज्यात विविध ठिकाणी राजकीय नेत्यांनी (माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, खासदार शरद पवार, आमदार रोहित पवार, आमदार अमरीश पटेल) कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केल्याबद्दल कारवाई करण्याची विनंती या अर्जात केली होती. हा अर्ज याचिकाकर्त्यांनी माघारी घेतला आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांना काही तक्रार असेल तर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटना घडली, त्या ठिकाणी त्यांना नियमानुसार तक्रार दाखल करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.