औरंगाबाद- गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी होत असल्याने हर्सूलचा तलाव कोरडाठाक पडला होता. मात्र, तीन वर्षानंतर आलेल्या परतीच्या पावसामुळे हर्सूलचा तलाव आता भरायला लागला आहे. तीन वर्ष कोरडे असलेल्या धरणामध्ये गेल्या आठ दिवसात पडलेल्या परतीच्या पावसामुळे जवळपास आठ फूट पाणी साचले आहे. त्यामुळे जुन्या शहराला उन्हाळ्यापर्यंत पाणीटंचाई भासणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हर्सूल तलावाचा आढावा देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी शहराची तहान भागविण्यासाठी मलिक अंबरने शहरात नरे अंबरी तयार केली. यामुळे नैसर्गिकरित्या पाण्याचे स्त्रोत शहराला मिळत होते. मात्र, १९५४ मध्ये निजाम स्टेटने शहराची वाढती तहान पाहता हर्सूल तलाव बांधला. जायकवाडीतून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १९७५ मध्ये पहिली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, हर्सूल तलाव त्या आधीपासूनच औरंगाबाद शहराची तहान भागवायचा.
५२ नहरी आणि हर्सूल तलाव यामधून जुन्याकाळी ११.५ एमएलडी पाणी शहराला पुरवले जायचे. हर्सूल तलावात मुबलक पाण्याचा साठा तयार झाला तर आजही शहरातील १८ वॉर्डांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात पर्जन्यमान कमी झाल्याने हा तलाव कोरडा पडला होता. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाई पाहायला मिळाली होती. २०१६ मध्ये चांगला पाऊस झाल्याने हर्सूल तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. २८ फूट साठवण क्षमता असलेल्या या तलावाची पाणी पातळी १९ फुटांवर जाऊन पोहोचली होती. त्यामुळे हर्सूल तलावामधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने, पैठणच्या मुख्य पाणीपुरवठा योजनेच पाणी इतर भागांना वगळण्यात आले होते. त्यामुळे शहरात पाणीटंचाईचा सामना कमी प्रमाणात करावा लागला होता. २०१६ नंतर आजपर्यंत या तलावात मुबलक पाणी साठा झालेला नव्हता. २०१७ मध्ये आठ फुटापर्यंत पाणी आले होते. त्यानंतर, मात्र पावसाने पाठ फिरवल्याने हा तलाव गेली तीन वर्ष कोरडेठाक पडला होता.
मात्र, यंदा परतीच्या पावसाने या तलावाला पुन्हा पाणी आले. हर्सूल तलावात सध्यास्थितीत आठ फुटांपर्यंत पाणी भरले आहे. साधारण दहा-बारा फूट उंचावर पाणीपातळी गेल्यानंतर या तलावातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे निश्चितच पावसाचा मुक्काम वाढला तर या तलावामध्ये पाणी अजून साठेल आणि जवळपास १८ वॉर्डांची तहान उन्हाळ्यापर्यंत तरी भागेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पावसाने आपली सरासरी ओलांडली आहे. लहान मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नसली तरी जिल्ह्यातील १६ मध्यम धरणांपैकी पाच धरणे तुडुंब भरली आहे. त्यामुळे काही गावांना दिलासा मिळाला आहे. औरंगाबादच्या हर्सूल तलावाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
हेही वाचा-दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यामुळे तरुणाची रस्त्यावर हत्या