औरंगाबाद - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या शेतकऱ्यांच्या जीवावर चालतात. मात्र या बँकेचे संचालक मंडळ तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांचे अध्यक्ष, संचालक शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहेत. शासनाने दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती दिलेली असताना बँकांनी नियमांची पायमल्ली करत शेतकऱ्यांकडून व्याज आकारून कर्जवसुली केली. शेतकऱ्यांवर आसूड उगवला असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशी भूमिका हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केली. जिल्हाभरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बाजूने आपली ठाम भूमिका बजावली पाहिजे मात्र तसे होताना दिसत नसल्याचेही ते म्हणाले. कन्नड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सत्ताधारी पक्षाचे असून मंत्रीदेखील आहेत. मात्र, त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडलेला दिसतो, तर बँक कुणा व्यावसायिकाच्या हाती दिली असल्याचे वाटत आहे. शेतकऱ्यांचे हित न बघता त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार चालू असल्याचे दिसत आहे. एकीकडे मुख्यमंत्री सेनेचे असताना ते शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती देतात मात्र त्यांचेच मंत्री ज्या बँकेचे संचालक आहेत त्याच बँकेकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत आहेत. बँक आदेशाला न जुमानता व्याजआकारणी करून कर्जवसुली करत असताना न्यायालयाने बँकेस कर्जवसुली व व्याज आकारणी करू नये, असे आदेश दिलेले आहेत असे असताना बँक शेतकऱ्यांची वसुली करतच आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हे का दाखल करू नये, असा प्रश्न जाधवांनी उपस्थित केला आहे.