औरंगाबाद- लोकसभा निवडणूकीत शिवसेनेला धक्का देणारा 'शिवस्वराज बहुजन पक्ष' आता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केले आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत पक्षातर्फे स्वतंत्रपणे औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा जागा लढवण्यात येणार आहेत. शहरातील 3 आणि कन्नड, गंगापूर आणि वैजापूर अशा 6 जागा असणार आहेत.
हेही वाचा - महापोर्टलमध्ये मध्यप्रदेशातील व्यापमपेक्षाही मोठा घोटाळा - राजू शेट्टी
कन्नडचे माजी आमदार असलेले हर्षवर्धन जाधव यांनी 3 महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजीनामा देत शिवस्वराज बहुजन पक्षाच्या माध्यमातून निवडणुक लढवत 2 लाख 83 हजार मते घेतली होती. हर्षवर्धन यांनी मिळालेल्या मतांमुळे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत हर्षवर्धन जाधव यांनी किंग मेकरची भूमिका बजावली होती. तर आता विधानसभा निवडणुकीत आपली ताकद आजमावणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले आहे.