कन्नड(औरंगाबाद)- राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मी कोचीन येथे जाणार होतो. परंतु, कोरोनामुळे मला पिशोर येथे राहण्यास यावे लागले. माझी आई यापूर्वीच पिशोर येथे राहण्यास आलेली आहे. कदाचित या निर्णयामुळे मी पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहे असे काही लोकांना वाटेल. परंतु, मी पुन्हा राजकारणात परतणार नाही, असे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन जाधव हे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. यामध्ये अनेक बाबींचा त्यांनी खुलासा केलेला आहे. यात ते राजकारणातून निवृत्त होत असल्याचे त्यांनी पूर्वीही सांगितले होते. कदाचित कन्नड तालुक्यात पिशोर येथे राहायला आल्यानंतर काही राजकीय मंडळींना असे वाटू शकते की, मी पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहे. परंतु, मी राजकारणापासून पूर्णपणे स्वतःला बाजूला ठेवले आहे. यानंतर मी कुठलीही निवडणूक लढविणार नाही.