औरंगाबाद - दिव्यांग आंदोलकांनी महानगपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार अडवल्याने महापौर नंदकुमार घोडेले यांना स्वत:ची गाडी सोडून रिक्षाने जायची वेळ आली. यासोबत काही नगरसेवकांना आपल्या गाड्यांऐवजी पर्यायी व्यवस्था करुन बाहेर जावे लागले.
दिव्यांगांसाठी असलेल्या निधी मिळावा यासाठी गेल्या वर्षभरापासून हे दिव्यांग महानगरपालिकेच्या खेटा मारत आहेत. अनेक वेळा आंदोलन करुनही शासनातर्फे देण्यात येणारा निधी मिळाला नाही. म्हणून दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या जिल्हा काँग्रेस समितीच्या सदस्यांनी, महानगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांचाच रस्ता अडवून आंदोलन केले. गुरुवारी औरंगाबाद महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचे कामकाज सुरू असताना अचानक दिव्यांग आंदोलकांनी आंदोलनाला सुरुवात केली. महानगर पालिकेचे मुख्य प्रवेशद्वार आंदोलकांनी अडवले. इतकेच नाही तर महापौरांची गाडी महालिकेत आणण्यासाठी असणारे विशेषद्वार देखील आंदोलकांनी अडवले. तसेच सर्वसाधारण सभा झाल्यावर एकही चारचाकी वाहन बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली.