टॅक्स पावतीवर असलेल्या गुजरात उल्लेखाविषयी आक्षेप नोंदविताना नागरिक सतीश सुराणा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : Gujarat Chhatrapati Sambhajinagar : शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं. मात्र, आता हे शहर महाराष्ट्रात आहे की गुजरातमध्ये, असा प्रश्न पालिकेच्या कारभारामुळं उपस्थित झालाय. शहरातील नागरिकांनी कर भरल्यावर मिळणाऱ्या पावतीवर चक्क 'गुजरात छत्रपती संभाजीनगर' असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळं एक वेगळा संभ्रम या निमित्तानं निर्माण झालाय. महानगरपालिका महाराष्ट्रातली आणि त्यावर गुजरात असा उल्लेख असू कसा शकतो? घडत असलेल्या या प्रकारामुळं राजकारण्यांना पुन्हा टीका करण्यासाठी वेगळा मुद्दा मिळालाय. तरीपण एवढी मोठी चूक होऊच कशी शकते? असा प्रश्न नक्कीच उपस्थित झालाय.
नागरिकानं भरलेल्या पावतीवर उल्लेख : नूतन कॉलनी येथे राहणारे व्यावसायिक सतीश सुराणा यांना काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मालमत्ता कर भरण्याबाबत सांगण्यात आलं. लवकर कर नाही भरला तर कारवाई होईल, अशी तंबी त्यांनी दिली गेली. त्यावर सतीश सुराणा यांनी ऑनलाइन पद्धतीने आपला कर तातडीने भरला. मात्र, त्यानंतर त्यांना मिळालेली पावती धक्कादायक होती. कारण त्यात 'गुजरात छत्रपती संभाजीनगर' असा उल्लेख होता, मात्र, पिन कोड नंबर हा शहराचा होता. त्यामुळे नेमका हा प्रकार काय असा प्रश्न सुराणा यांना पडला.
संभाजीनगर महानगरपालिकेची टॅक्स पावती पालिकेचं स्पष्टीकरण : याबाबत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी असं काही नाही, अशी माहिती दिली. हा कोणी खोडसाळपणा केला आहे का? किंवा काही तांत्रिक बिघाड यात आहे का? याबाबत आम्ही तपास करू आणि लवकरच तांत्रिक चूक सुधारू, असं आश्वासन त्यांनी दिलंय.
नामांतरवरून पहिलेच सुरू आहे गदारोळ :औरंगजेबाच्या नावावरून औरंगाबाद असं नाव या शहराला मिळालं. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या शहरात मागील काही वर्षांत अनेक वादाचे मुद्दे समोर आले. त्यात शहराचं नाव बदलण्यावरून अनेकवेळा राजकीय आणि सामाजिक वाद, विवाद पाहायला मिळाले. त्यानंतर शहराला छत्रपती संभाजीनगर असं नवीन नाव राज्य आणि केंद्र सरकारच्या मान्यतेमुळं मिळालं. त्यावरुन राजकारण तापत असताना, जिल्ह्यातील उद्योग गुजरातला पळवल्याचा आरोप सरकारवर करण्यात आला होता. त्यात महानगरपालिकेच्या पावतीवर गुजरात असा असलेला उल्लेख पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडणार आहे. त्यामुळं आगामी काळात याचं राजकारण झालं तर नवल वाटायला नको.
हेही वाचा:
- Measles Patient : औरंगाबादेत गोवरचा शिरकाव; आठ रुग्ण आढळले, सर्वेक्षण सुरू
- औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांची उद्यानात भटकंती, प्रशासन गप्प
- औरंगाबाद : रुग्ण संख्या वाढत राहिली, तर लागणार लॉकडाऊन अटळ!