औरंगाबाद - जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी नियोजन आढावा बैठक घेतली. यात जिल्ह्यासाठी २६५ कोटींपेक्षा जास्त निधी मागणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली. शहरातील काही प्रश्नांबाबत आढावा घेतला असल्याचे ते म्हणाले. घाटी रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांबाबत 26 जानेवारीला बैठक घेऊन समस्या सोडवण्यासाठी उपाय योजना करू, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी उद्योजकांसोबत बैठक घेतली. माहिती तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढावी यासाठी उद्योजकांशी चर्चा केली, ऑरिक सिटीला भेट दिली आहे. शेती आधारित उद्योगात ज्याची गरज आहे, अशा शेती उत्पादनांची मूल्यवाढ झाली पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाचे उद्योग वाढावे यासाठी टाटा समूहांसह इतर उद्योजकांनी मान्य केले आहेत. ऑरिक सिटीत ५०० एकर फूड मार्कचे लवकरच भूमिपूजन करू, अशी माहिती यावेळी पालकमंत्री देसाई यांनी औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
देसाई म्हणाले, औरंगाबादच्या पर्यटनाबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत लवकरच औरंगाबाद दौरा आणि अडचणींबाबत चर्चा करणार आहोत. अजिंठा-येरुळ महोत्सवाबाबत नियमितता आणण्यासाठीही प्रयत्नशील आहोत. अवकाळी पावसामुळे शाळेच्या इमारतींचे नुकसान झाले, त्या चांगल्या कराव्यात यासाठी निधी वाढवून मागणार असून त्यासाठी काही सामाजिक संस्थांचा सहभागही घेणार आहोत. आता जिथे काम चालू आहे किंवा झाले आहे त्यांच्या अहवालात तफावत आढळून आल्यास वेळ काढून स्वतः प्रत्यक्षात जाऊन पाहणी करून दोषींवर कारवाई करणार आहे.
औरंगाबादच्या मकबरा रस्त्याबाबत आलेली माहिती आणि प्रत्यक्षात असलेली वस्तुस्थिती पहिली असता त्यात तफावत आढळुन येते. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर दोष निश्चित करण्यात येईल. पैशांचा अपव्यय सहन करणार नाही, असे देसाई यांनी सांगितले. उर्दू शाळांना शिक्षक नसल्याची तक्रार मिळाली होती, त्याबाबत त्या विभागाला सूचना केल्या आहेत. मात्र, टीईटी पात्र शिक्षक मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. शिक्षक मिळावी यासाठी टीईटीच्या काही अटी शिथिल करून भरती करा अशा सूचना केल्या असल्याचे देसाई म्हणाले.