औरंगाबाद- पैठण तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त पाच मिनिटांत आटोपली. यामुळे शेतकऱ्यात त्यांच्या या दौऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात असून हा दौरा प्रसारमाध्यमात झळकण्यासाठीच होता का, अशी चर्चा गावकरी करत आहेत.
शिवसेनेचा दुष्काळी दौरा केवळ फार्स, एकनाथ शिंदेंनी पाच मिनिटांत घेतला आढावा - sachin jire
औरंगाबाद - पैठण तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त पाच मिनिटांत आटोपली.
पैठण तालुक्यातील आडुळ, पाचोड, बालानगर आदी भागात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी, चारा टंचाईने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्री एकनाथ शिंदे हे पैठण दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मंगळवारी सकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आडुळ शिवारात मनोज वाघ यांच्या शेतात जाऊन सुकलेल्या मोसंबीच्या बागेची पाच मिनिटे पाहणी केली आणि पालकमंत्र्यांनी परतीची वाट धरली. यावेळी त्याच्या सोबत खा.चंद्रकांत खैरे, आ. संदीपान भुमरे यांच्यासह औरंगाबाद येथील शिवसेना पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी पाहणी दरम्यान पाणी टंचाई, चारा टंचाई या संदर्भात शेतकऱ्यांसोबत चर्चा केली नाही. गाडीतून आले मोसंबी बागेत गेले आणि पाच मिनिटांत गाडीत बसून औरंगाबादकडे रवाना झाले. त्यामुळे त्यांचा पैठण दौरा फक्त प्रसारमध्यमात झळकण्यासाठी होता का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.