औरंगाबाद - राज्यात सात हजार पेक्षा अधिक मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी ( Gram Panchayat Election ) 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील देखील एकूण 216 ठिकाणी निवडणूक ( Gram Panchayat Electगon In Aurangabad District ) पार पडणार आहे. मात्र मतदान होण्यापूर्वी 14 सरपंचांची बिनविरोध निवड झाली असून, 308 सदस्यांचीही लॉटरी लागली आहे. तर उरलेल्या जागांसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीचे साहित्य मतदान केंद्रावर पोहोचले असून प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
निवडणुकीची रणधुमाळी शिगेलाजिल्ह्यात मुदत संपलेल्या 216 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत थेट सरपंचपदासाठी 1092, तर सदस्यपदासाठी 5481 अशा 6573 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी 371 जणांचे अर्ज छाननीत बाद ठरले. तर 1900 जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने सध्या सरपंचपदासाठी 611 तर सदस्यासाठी 3626 असे 4237 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. दरम्यान, यात थेट सरपंचपदी 14 तर सदस्यपदी 308 उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवार रिंगणात शिल्लक नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.