औरंगाबाद -गेल्या काही दिवसांपासून पदवीधर निवडणुकीत मतदार नोंदणी करण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी मतदार नोंदणी पूर्ण झाली नसल्याचे दिसून येत आहे. याचे चांगले उदाहरण औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात बघायला मिळाले. जिथे अख्या गावात फक्त दोनच पदवीधर मतदार आहेत. विशेष म्हणजे दोघेही पती-पत्नी आहे.
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील साडे अठराशे लोकसंख्या असलेल्या रांजणगाव दांडगा गावात फक्त दोनच पदवीधर मतदार आहेत. शकील साहेबलाल शेख आणि त्यांची पत्नी नौशाद शकील शेख असे त्यांचे नाव आहे. त्यांनी बालानगर मतदानकेंद्रात आज दुपारी 12 वाजता मतदान केले.
मतदार नोंदणी सक्षम करण्याची गरज
एकीकडे निवडणूक आयोग मतदारनोंदणी करण्यासाठी वेगवेगळे अभियान राबवत आहे. मराठवाड्याची लोकसंख्या कोटींच्या वर आहे. त्यात नवमतदार मोठ्या संख्येने असल्याचा दावा केला जात आहे. अे असताना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार चार लाखांच्या घरात कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उच्चशिक्षितांनाच मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे पदवीधरांची नोंदणी का होत नाही? हा देखील प्रश्न आहे.
मतदान करण्याचे आवाहन
2014च्या निवडणुकीत अवघ्या 36 टक्के पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. औरंगाबाद जिल्ह्यात 206 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. तर दुपारी 4 वाजेपर्यंत 53.30 टक्के मतदान झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच लोकांनी पुढे येऊन मतदान करावे, असे आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला आहे. या आवाहनाला शिक्षित मतदार किती प्रतिसाद देतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.