औरंगाबाद - समाजाच्या जडणघडणीला संत-महात्मे दिशा देत असतात. श्री समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण अखिल विश्वाला दिशादर्शक ठरणारी आहे. देशावर जेव्हा-जेव्हा संकट येते, तेव्हा महापुरुषांचा जन्म होतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari in Aurangabad ) यांनी रविवारी केले. तापडिया नाट्यमंदिरात आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एकदिवसीय श्री समर्थ साहित्य संमेलनात राज्यपाल बोलत होते. मंचावर यावेळी संत साहित्य शिक्षण व संशोधन प्रतिष्ठान औरंगाबाद, श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट औरंगाबाद, श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे, श्री समर्थ मंदिर संस्थान जांब, श्री गणेश सभा, श्री एकनाथ संशोधन मंदिर या संयोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आपला समाज आणि राष्ट्र बलशाली होण्यासाठी संत विचारांचा प्रवाहीपणा आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आपल्या देशात समृध्द गुरूपरंपरा चालत आलेली आहे. मानवी जीवनामध्ये सदगुरू लाभणे ही मोठी उपलब्धी आहे. संत साहित्यातून हे सर्वार्थाने साध्य होते. महान विभूतींना संत साहित्याने नेहमीच मार्गदर्शन केलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मराठी भाषा गौरव दिनी श्री समर्थ साहित्य संमेलनाचे आयोजन एक स्त्युत्य उपक्रम आहे. मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्रातील समाजमन घडविण्यात समर्थांची शिकवणूक महत्वपूर्ण राहिलेली आहे, असे राज्यपालांनी म्हटलं.