औरंगाबाद- मराठवाड्यातील काही भागातील रेशन दुकानांवर धान्याचा तुडवडा जाणवत आहे. असे असले तरी प्रशासनाच्या माहितीनुसार लागणाऱ्या धान्यापैकी जास्त धान्यासाठी उपलब्ध असून कोणालाही धान्य कमी पडणार नाही, असे सांगितले असल्याने विरोधाभास समोर येत असल्याचे दिसून येत आहे.
देशात लॉकडाऊनच्या काळात गरिबांना रेशन दुकानातून धान्य मिळेल, अशी घोषणा करण्यात आली. त्यानुसार ज्यावेळी गरजू रेशन दुकानात गेले असता अनेक ठिकाणी धान्यसाठा संपल्याचे लोकांना ऐकायला मिळत आहे तर मिळणारे धान्य हे सर्वांसाठी नसून फक्त कार्ड धारकांनाच मिळत असल्याने हातावर पोट असणाऱ्या पण रेशन कार्ड नसणाऱ्या लोकांना मात्र उपाशी राहण्याची वेळ येणार आहे.
कोरोनामुळे सर्वत्र कामे बंद आहेत. त्यात गरीब आणि हातावर पोट असलेल्या लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे नेहमी बोलले जाते. मात्र, प्रत्यक्षात तसे आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण गरिबांना धान्य उपलब्ध करून देणाऱ्या रेशन दुकानात अनेक ठिकाणी रेशन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गरिबांचा वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त विजय फड यांच्याकडून घेतलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात ११ हजार ४४१ रेशन दुकाने असून ४० मेट्रिक टन अतिरिक्त धान्य साठा उपलब्ध आहे. ज्यामध्ये फक्त रेशन कार्डधारकांना धान्य वाटप केले जात आहे. नागरिकांना नियमित दरांमध्ये गहू आणि तांदूळ खरेदी करावे लागत आहेत. औरंगाबादमध्ये अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांचे रेशनचे वाटप गहू 2 रु किलो तर तांदूळ 3 रु किलो दराने देण्यात येत आहे.
ज्या योजनांमध्ये मोफत धान्य वाटायचे आहे त्यात पाच किलो तांदूळ प्रतिव्यक्ती देण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली तर शिव भोजनच्या माध्यमातून मराठवाड्यात ११४ केंद्रांच्या माध्यमातून १७ हजार १७५ जणांना भोजन दिले जात असल्याची माहिती मिळाली आहे. शासनाकडे असलेल्या माहितीनुसार सर्व रेशन दुकानात अन्नधान्य साठा उपलब्ध असायला हवा. मात्र, तसे होत नसल्याने रेशन दुकानात मिळणाऱ्या धान्यसाठ्याचा काळाबाजार तर सुरू नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.