सिल्लोड -कोरोनामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने सर्व जण घरीच आहेत. लॉकडाऊनकाळात नेमकं करावं तरी काय असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र घाटनांद्रा येथील सत्तर वर्षांच्या आजी चंद्रकलाबाई जोशी यांनी या लॉकडाऊनचा सदुपयोग करत, तब्बल 25 ते 30 हजार वाती तयार केल्या आहेत.
कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनाने राज्यात कडक निर्बंध घातले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे नागरिक घरात बसूनच आपला वेळ घालवत आहेत. अनेक नागरिक या लॉकडाऊनचा फायदा घेऊन आपल्यामध्ये असलेली कला जोपासत आहेत. काहीजण विनकाम, शिवणकाम, गायन, वादण या सारख्या गोष्टींमध्ये वेळ घालवत आहेत.
दिवसाला 900 ते 1000 वातींची निर्मिती
घाटनांद्रा येथील रहिवासी असलेल्या चंद्रकलाबाई जोशी या गावात आजी या टोपन नावाने परिचित आहेत. सध्या त्यांचे वय 70 वर्ष असून, लॉकडाऊनच्या काळात त्या वाती तयार करण्याचे काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 20 ते 30 हजार वाती तयार केल्या आहेत. पूर्वी त्या दिवसभरात 500 ते 600 वाती तयार करत, मात्र आता लॉकडाऊनमुळे दिवसभर घरीच असल्याने त्या दिवसाला 900 ते 1000 वाती तयार करतात. दरम्यान गावातील महिलांनी त्यांच्याकडे वाती मागितल्यास त्या कोणताही आर्थिक मोबदला न घेता या महिलांना वाती देतात.
लॉकडाऊनमध्ये आजींनी केल्या हजारो वाती कोरोनाकाळात घरीच राहण्याचे आवाहन
आजींनी गावातील नागरिकांना देखील घरीच राहाण्याचा सल्ला दिला आहे. घरी राहूनच आपण कोरोनावर मात करू शकतो. कोरोना नियमांचे पालन करा. घरी रहा, सुरक्षीत रहा असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा -पदोन्नतीतील आरक्षण कायम राहावे; विरोधातील जीआर रद्द करायला भाग पाडू - काँग्रेसची भूमिका