औरंगाबाद - गोदावरी नदी पूर्णतः कोरडी झाल्याने आसपासच्या गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. इतकेच नाही तर नदीपात्रात पाणीच नसल्याने नदीतील मासेही तडफडून मरत आहेत. नदीच्या काठच्या गावकऱ्यांना नदी पात्रातील वाळू बाजूला करून खड्डे करून पाणी काढावे लागत आहे.
दुष्काळ दाह : गोदाकाठच्या लोकांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ
नदीच्या काठच्या गावकऱ्यांना नदी पात्रातील वाळू बाजूला करून खड्डे करून पाणी काढावे लागत आहे.
पैठण तालुक्यात जायकवाडी धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आले. दुष्काळाची मोठी झळ बसल्याने आज गोदावरी नदीपात्र पूर्णतः कोरडे पडले आहे. त्यामुळे आसपासच्या गावकऱ्यांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. नदीपात्रात काही ठिकाणी पाण्याची डबकी आहेत. त्या पाण्यात मासे शेवटच्या घटका मोजताना दिसत आहेत. तर अनेक ठिकाणी कोरड्या झालेल्या नदी पात्रात मासे मरून पडल्याचे पाहायला मिळत आहे.
नदी काठच्या गावातील नागरिक नदी पात्रातील साठलेल्या वाळूत खड्डे करून जमा होणाऱ्या पाण्यावर तहान भागवत आहेत. गोदावरी नदी पात्राच्या परिसरात असलेली पाण्याची भीषण टंचाई आणि अवस्था पाहता दुष्काळ कशा पद्धतीने ग्रामीण भागात शिरकाव करत आहे आणि त्याचा परिणाम किती भीषण आहे याचे वास्तव दर्शवत आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अद्याप एक महिना शिल्लक असल्याने उरलेले दिवस काढायचे कसे असा प्रश्न गोदाकाठच्या नागरिकांना पडला आहे.